बंगळुरु/कोलाड :  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंधनाच्या वाढत्या दरांविरोधात आज बैलगाडी मार्च काढला. कर्नाटकमधील कोलाडमध्ये हा मार्च काढण्यात आला. स्वत: बैलगाडीत बसून राहुल गांधींनी हा मार्च काढला आणि मोदी सरकारवर सडकून टीकाही केली.


भाजप सरकारने 2014 पासून आतापर्यंत 10 लाख कोटींचा कर जमा केला. मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे कोणताही दिलासा मिळालेला नाही, अशा शब्दात राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. मात्र अच्छे दिनचा वायदा करणारं मोदी सरकार याबाबत गप्प का आहे? असा सवालच राहुल गांधींनी विचारला आहे.

दरम्यान राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचा आणि काही भाजपच्या नेत्यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्यात त्यांनी 2014 पासून इंधनावरील कराच्या माध्यमातून सरकारने 10 लाख कोटी रुपये जमवल्याचं म्हटलं आहे. मात्र इतकं असूनही सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. हा व्हिडीओ मोदी सरकारच्या फोल ठरलेल्या दाव्यांतील वास्तव दाखवत असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.