नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीसाठी आपल्याकडे मदत मागितल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्याकडे कोणीतीही मदत न मागितल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. या मुद्द्यावरुन देशात राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याबाबत नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. देशाला खरं सांगा, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


मोदींनी स्पष्टीकरण द्यावं: राहुल गांधी 


"डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील काश्मीर वादावर मध्यस्थी करण्यास सांगितलं. हे खरं असेल तर मोदी भारताचं हित आणि 1972 चा शिमला करार मोडत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने केवळ स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशाला सांगावं की, ट्रम्प यांच्या सोबतच्या बैठकीत त्यांची काय चर्चा झाली", असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.





परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण


लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांत आज हा मुद्दा गाजला. मात्र मोदींनी अमेरिकेकडे काश्मीरप्रश्नी कोणतीही मदत न मागितल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी जो दावा केला आहे, तो चुकीचा आहे. काश्मीर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील द्विपक्षीय मुद्दा आहे. दोन्ही देश मिळून हा प्रश्न सोडवतील. पाकिस्तानने प्रथम दहशतवादावर लगाम लावला पाहिजे. शिमला आणि लाहोर कराराप्रमाणे द्विपक्षीय चर्चेने काश्मीर प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असं एस जयशंकर यांनी सांगितलं.


डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसने ट्रम्प यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावर सरकारने उत्तर द्यावं अशी मागणी केली. यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली. काँग्रेसकडून रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींकडे उत्तर मागितलं. तर राज्यसभेत आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उचलून धरला. पंतप्रधान मोदींनी या मुद्द्यावर उत्तर द्यावं, अशी मागणी करत विरोधकांनी सभागृहातून वॉक आऊट केला.


अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण


राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन सुरु झालेला गोंधळ पाहून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने परिपत्रक जारी केलं. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयानंतर व्हाईटहाऊसनेही याबाबत स्पष्टीकरण दिलं. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मुद्दा आहे. दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून तो सोडवला पाहिजे, असं व्हाईटहाऊसने म्हटलं आहे. काश्मीर मुद्द्यावर अमेरिका सर्व मदत करण्यास तयार आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कडक कारवाई केली पाहिजे. दहशतवाद संपुष्टात आल्यास काश्मीर प्रश्न सोडवण्यास मदत होईल, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिला.


काय म्हणाले होते ट्रम्प?


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपल्याकडे मदत मागितल्याचा दावा केला. काश्मीर मुद्द्यावर दोन्ही देशात मध्यस्थी करण्यास मला आवडेल आणि आनंद होईल, असंही ट्रम्प यांनी म्हटलं.




संबंधित बातम्या