Rahul Gandhi At Delhi Lal killa Speech: काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi News) यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला. आज काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) दिल्लीत पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं की, देशात मोदींचं नाही तर अदानी अंबानींचं सरकार आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, संपूर्ण देशाला माहित आहे की देशातलं हे सरकार नरेंद्र मोदींचे सरकार नाही, हे अंबानी अदानींचे सरकार आहे. मी 2,800 किमी चाललो, मला कुठेही द्वेष किंवा हिंसाचार दिसला नाही, परंतु जेव्हा मी न्यूज चॅनेल उघडतो तेव्हा मला नेहमीच द्वेष-हिंसा दिसते, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. मी एक शब्दही बोललो नाही कारण मला त्यांच्याकडे किती शक्ती आहे हे पहायचे होते. भाजपकडून नेहमी हिंदू धर्माबद्दल बोललं जातं, पण गरीबांना चिरडून टाका, असे हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे का? असा सवाल त्यांनी केला.
चीनबद्दल तुम्ही काय बोललात? पंतप्रधानांना सवाल
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात सीमेवर कोणीच आले नाही, मग लष्कराने 21 टप्प्यांमध्ये चर्चा का केली? चीनने आपली 2 हजार चौरस किलोमीटर जमीन कशी बळकावली? असा सवाल त्यांनी केला.
शांघायमध्ये बूट दिसला तर तो मेड इन इंडिया असं लिहिलेला असेल
राहुल गांधी म्हणाले की, तुमच्या सेलफोन आणि शूजच्या मागे मेड इन चायना लिहिलेले दिसते. तिथं मेड इन इंडिया लिहायचे आहे. असा दिवस यावा की शांघायमध्ये बूट दिसला तर तो मेड इन इंडिया असं लिहिलेला असेल. यातून तरुणांना रोजगार मिळेल, असंही ते म्हणाले.
शेतकरी आणि छोटे व्यापारी बँकेत जातात तेव्हा त्यांना हाकलून दिलं जातं
राहुल गांधींनी पुढं म्हटलं की, या देशाला जर कोणी रोजगार देऊ शकत असेल तर तो शेतकरी आणि छोटे व्यापारी आहेत. कारण देशात लाखोंची संख्या त्यांचीच आहे. या लोकांसाठी बँकेचे दरवाजे बंद असतात. भारतातील 2-3 अब्जाधीशांना 1 लाख कोटी, 2 लाख कोटी, 3 लाख कोटी सहज दिले जातात पण जेव्हा शेतकरी आणि छोटे व्यापारी बँकेत जातात तेव्हा त्यांना हाकलून दिले जाते.