Qutub Minar Controversy : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या वादानंतर देशातील अन्य काही धार्मिक स्थळांबाबतही वाद पुढे आला आणि तो कोर्टात गेला आहे. असाच एका वादानं सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलं आहे. तो वाद म्हणजे, ऐतिहासिक वास्तूचा दर्जा असणाऱ्या कुतुबमिनार (Qutub Minar) परिसरात असणाऱ्या मशीद आणि मंदिरांशी संबंधित वाद. याप्रकरणी आज दिल्लीतील साकेत कोर्ट (Saket Court) महत्त्वाचा निकाल देणार आहे. कुतुबमिनारच्या परिसरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्लीतील साकेत कोर्ट आज, म्हणजेच 9 जून रोजी आपला निकाल सुनावणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 


यापूर्वी झालेल्या सुनावणीत हिंदू पक्षानं आणि आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडियानं (ASI) आपली बाजू मांडली होती. कुतुबमिनार परिसरात मंदिर उद्धवस्त करून  Quwwatul Islam मशीद उभारण्यात आली. त्यामुळे तिथं हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. यावर बोलताना 800 वर्षांपासून जर तिथे देव कोणत्याही पूजेशिवाय असेल तर त्यांना असं ठेवता येऊ शकतं, अशी टिप्पणी कोर्टानं केली होती. त्यावेळी कोर्टानं ASI आणि हिंदू पक्षाला एका आठवड्यात लिखित उत्तर देण्याचे आदेश दिले होते. तसेच, याप्रकरणी कोर्ट 9 जून रोजी आपला निर्णय देईल असं सांगितलं होतं. 


कुतुबमिनार संबंधित याचिकेत नक्की म्हटलंय काय? 


ऐतिहासिक कुतुबमिनार संबंधित एका याचिका दिल्लीतील साकेत कोर्टात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका वकील हरि शंकर जैन आणि वकील रंजना अग्निहोत्री यांच्यावतीने दाखल करण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टात दाखल याचिकेत दावा करण्यात आला आहे की,  कुतुब मीनार परिसरात हिंदू देवी देवतांच्या अनेक मूर्ती आहेत. याशिवाय कुतुबमिनार परिसरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे कलश, स्वस्तिक आणि कमळ यांसारखी प्रतिकं दिसतात, ज्यावरुन ही इमारतमधील हिंदूंचं अस्तित्त्व अधोरेखित करतं. कोर्टात दाखल याचिकेत म्हटलं आहे की, सध्याच्या कुतुबमिनार परिसरात भगवान विष्णु ऋषभ देव, शिव, गणेश, सूर्य आणि देवी गौरी, यांच्यासह जैन तीर्थंकर, नक्षत्रांसह भव्य आणि उंच हिंदू आणि जैन मंदिरं आहेत. मेरु टॉवरलाच आता कुतुब मिनार म्हटलं जातं, असा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे.


कुतुबमिनार म्हणजे विष्णुस्तंभ आहे आणि या परिसरात शिव, गणेश, सूर्य, देवी गौरी यांच्यासह काही जैन मंदिरं होती, असा दावाही या याचिकेतून करण्यात येत आहे. 27 हिंदू आणि जैन मंदिरांना उद्ध्वस्त करुन त्याच सामग्रीतून मशिद उभारण्यात आली, असाही दावा केला जात आहे. 


कुतुबमिनारमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करता येऊ शकत नाही, ASI चा दावा 


ASI नं गेल्या सुनावणीत आपली बाजू मांडताना कोर्टात सांगितलं की, कुतुबमिनारमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करता येऊ शकत नाही. त्या ठिकाणी स्मारक आहे. तर, दुसरीकडे हिंदू पक्षाच्यावतीनं हरिशंकर जैन यांनी सांगितलं की, 27 मंदिरं उद्धवस्त करून  कुव्वत उल इस्लाम ही मशीद उभारण्यात आल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे या ठिकाणी पूजा करण्यास परवानगी द्यावी. 


दरम्यान हिंदू पक्षानं अयोध्या प्रकरणाचा दाखला दिला होता. कुतुब मीनार परिसरात हिंदू देवी देवतांच्या अनेक मूर्ती आहेत. याशिवाय कुतुबमिनार परिसरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे कलश, स्वस्तिक आणि कमळ यांसारखी प्रतिकं दिसतात, ज्यावरुन ही इमारतमधील हिंदूंचं अस्तित्त्व अधोरेखित करते असा मुद्दा ही उपस्थित करता आला होता.