Brain Tumor Surgery : शस्त्रक्रियेचे नुसते नाव ऐकताच भल्याभल्यांचा थरकाप उडतो.  त्यातही  जर ब्रेन ट्यूमरसाठी शस्त्रक्रिया असेल तर त्याच्या तीव्रतेचा अंदाज लावता येईल. परंतु, ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्ण गाणे म्हणत  असेल तर त्याच्या धाडसाचे कौतुकच करावे लागेल. अशीच एक घटना छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून समोर आली आहे. तेथील खासगी रुग्णालयात एका रुग्णाच्या ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, ही शस्त्रक्रिया सुरू असताना तो गझल म्हणत होता. डॉक्टरांनी त्याचा एक व्हिडीओ बनवला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात  व्हायरल होत आहे.


राजकुमार पांडे असे ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन झालेल्या तरूणाचे नाव आहे. राजकुमार पांडे हा रायपूर येथील कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. मास्टर ऑफ जर्नालिझममध्ये अव्वल ठरल्याबद्दल ऑपरेशनच्या काही वेळापूर्वी राज्यपाल अनुसुईया उईके यांच्या हस्ते त्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले होते.


छत्तीसगडमधील रायपूर येथील सुयश हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु, ही शस्त्रक्रिया सुरू असताना रूग्ण चक्क गझल म्हणत होता. ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रियेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याने गुलाम अलींची 'हंगामा है क्यों बरपा' ही गझल गायली. आश्चर्य म्हणजे डॉक्टरांनी रुग्णाला बेशुद्धही केले नाही. तो गझल म्हणत राहिला आणि डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील ब्रेन ट्युमर काढला.


डॉक्टरांनी आधुनिक तंत्रज्ञानाने केलेल्या शस्त्रक्रियेचा व्हिडीओ तयार केला असून हा व्हिडीओ  सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रूग्णाची शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, "या शस्त्रक्रियेत रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. ऑपरेशन कितीही मोठे असले तरी त्याला भूल देण्याची गरज नाही."


दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक शस्त्रक्रियेच्या या तंत्राचे कौतुक करत आहेत. शिवाय रुग्णाच्या धाडसाचेही कौतुक करत आहेत. कारण ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते.  तरी देखील ही शस्त्रक्रिया सुरू असताना तो रूग्ण चक्क गझल म्हणत होता. एक एक प्रकारचे मोठे धाडसच आहे. त्यामुळे या तरूणाच्या धाडसाचे सध्या सोशल मीडियावरून कौतुक होत ओहे.