चंदिगढ : फक्त अभिनेते, क्रिकेटपटू यांचेच क्रेझी फॅन्स असतात, असं नाही! पंजाबचे एसपी (पोलिस अधीक्षक) सचिन अतुलकर यांचेही चाहते देशभरात पसरले आहेत. पंजाबमधील एक तरुणी आपल्या लाडक्या पोलिस अधिकाऱ्या भेटायला शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन मध्य प्रदेशला आली.

34 वर्षीय सचिन अतुलकर यांच्या फिटनेस आणि लूक्समुळे जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. पंजाबच्या होशियारपूरमध्ये राहणारी 27 वर्षांची तरुणी तीन दिवसांपूर्वी उज्जैनमध्ये दाखल झाली. अतुलकरांना भेटण्याचा हट्टच तरुणीने धरला आहे. त्यामुळे तिचं मन वळवून तिला परत पाठवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

'एसपी अतुलकरांच्या कार्यालयात आणि ते उपस्थिती लावत असलेल्या कार्यक्रमांना ती तरुणी हजर राहते आणि त्यांना भेटण्याचा प्रयत्न करते. ती अत्यंत आडमुठी आहे. पोलिसांनीी अखेर तिला सुधारगृहात नेलं' अशी माहिती एका महिला पोलिस अधिकाऱ्याने दिली.

'सोशल मीडियावर अतुलकर यांचे फोटो पाहिले, तेव्हा त्यांची बॉडी आणि लूक्स पाहून आपण घायाळ झाल्याचं ती सांगते. आम्ही तिच्या पालकांना इथे बोलवून घेतलं. पण ती आई-वडिलांसोबत परत जायलाही तयार नाही.' असंही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अतुलकरांची भेट मिळाली, तरच आपण घरी जाऊ, असं तरुणीचं म्हणणं आहे. संबंधित तरुणी मानसशास्त्र विषयात द्विपदवीधर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी तिला नागदा रेल्वे स्थानकावर नेऊन पंजाबला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवलं, मात्र तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारण्याची धमकी दिली. इतकंच काय तर मागेल ते खाणं-पिणं तिला पुरवलं जात आहे. अगदी पिझ्झासुद्धा तिला दिला जात आहे. पोलिस काऊन्सिलरच्या मदतीने तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

कामाचा भाग म्हणून आपण कोणाचीही भेट घेण्यास तयार आहोत, मात्र वैयक्तिक कारणांसाठी आपल्या मनाविरुद्ध भेटण्याची जबरदस्ती कोणीही करु शकत नाही, असं सचिन अतुलकर यांनी सांगितलं.

'मी सागर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक असताना एका सात वर्षांच्या मुलाच्या पालकांनी मला विनंती केली होती. माझी स्वाक्षरी मिळाली, तरच जेवेन असा हट्ट त्या चिमुरड्याने धरला होता. मी त्याचा आग्रह मोडला नाही' असा किस्साही अतुलकरांनी सांगितला.

सचिन अतुलकर अविवाहित आहेत. फिटनेस फ्रीक असल्यामुळे ते दररोज 70 मिनिटं जिममध्ये जातात. भोपाळमध्ये झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अतुलकरांनी फिटनेससाठी अनेक बक्षिसंही पटकावली आहेत.