मुंबई : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना जम्मू काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याच्या भाजपच्या निर्णयाची कल्पनाच देण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमध्ये भाजपने पाठिंबा काढल्याची बातमी माध्यमांनी दिल्यानंतरच, राजनाथ सिंहाना पीडीसोबतची युती तुटल्याचे समजले.


भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पीडीपीसोबतची युती तोडण्याबाबत निर्णय झाला. ‘द टेलीग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यावेळी राजनाथ सिंह हे त्यांच्या नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात होते. माध्यमांमध्ये काश्मीर सरकारमधून भाजप बाहेर पडल्याची बातमी झळकताच या निर्णयाबाबत कोणतीच कल्पना नसलेले राजनाथ सिंह आपल्या निवासस्थानी रवाना झाले.

गृहमंत्रालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "राजनाथ सिंहांना काश्मीर सरकारचा पाठिंबा काढण्याबाबत विश्वासात घेण्यात आलं नव्हते. राम माधव यांनी सरकारमधून बाहेर पडल्याची घोषणा केली तेव्हा गृहमंत्रालयातील अधिकारीही आश्चर्यचकित झाले.

"केंद्र सरकारमध्ये राजनाथ सिंह हे अधिकृतपणे क्रमांक दोनचे मंत्री आहेत, पण ते फक्त कागदावरच," अशी प्रतिक्रिया या सर्व घटनाक्रमानंतर गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयात अजित डोभाल यांचे वजन वाढल्याने राजनाथ सिंह यांना डावललं जात आहे. अंतर्गत सुरक्षेसह काश्मीरबाबतचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या अजित डोभाल यांच्याकडून घेतले जातात.

दरम्यान, 2019 च्या आधी केंद्र सरकार दहशतवादाविरोधात जम्मू काश्मीरमध्ये मोठी मोहीम राबवणार असल्याचं कळतं.