चंदीगड : कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्यामुळे दिल्लीनंतर संपूर्ण पंजाबमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आज रात्री ते 30 एप्रिलपर्यंत दररोज रात्री 8 तास कर्फ्यू लागू केला जाणार आहे. या कालावधीत राज्यभरात रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत निर्बंध असतील. पंजाब सरकारनेही राज्यातील राजकीय सभांना बंदी घातली आहे.


यापूर्वी 30 एप्रिलपर्यंत राजधानी दिल्लीत नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. तिथे रात्री 10 ते सकाळी 5 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू केला जात आहे. यादरम्यान सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील. सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्नासाठी खुल्या जागेत 200 लोकांना तर बंद जागेत 100 लोकांना परवानगी आहे.


यूपीमध्येही नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता
कोरोना संसर्ग इतक्या वेगाने वाढत आहे की उत्तर प्रदेश सरकार देखील नाईट कर्फ्यू लावण्याची शक्यता आहे. कोरोनाची वाढत्या केसेस लक्षात घेता अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नाईट कर्फ्यू लावण्यासंबंधी विचार करण्यास सांगितले आहे. कोरोनाची दुसरी लाट थांबविण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. परंतु, सरकारच्या सूचनांचे योग्य पालन केले जात नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचनांचे राज्यातील जनतेने पालन करण्याचे आवाहन केलं आहे. कोर्टाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.


गेल्या 24 तासांत देशात कोविडची 1,15,736 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी गेल्या वर्षाच्या सुरूवातीला साथीच्या रोगानंतर एका दिवसातली सर्वात मोठी वाढ ठरली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, बुधवारी कोविडच्या एकूण रुग्णांची संख्या 12,801,785 झाली आहे.


देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस द्या, राहुल गांधींची मागणी
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना कोरोनाच्या लसीकरणावरुन राजकारण सुरू झाल्याचं दिसून येतंय. कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची ठराविक अट लादली असताना सरसकट सर्वांनाच कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. वयाची अट घालणे म्हणजे निरर्थक वाद आहे असंही ते म्हणाले.