मुंबई : RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पतधोरण जाहीर केलं असून व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये रेपो दर 4 टक्के तर रिव्हर्स रेपो 3.35 टक्के जैथे थे ठेवला आहे. कोरोना काळात आधीच अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला असताना जर व्याजदरात बदल केले तर विकासामध्ये अडथळा येण्याची शक्यता असल्याने सध्या त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. सोबतच 2021-22 या वर्षासाठी 10.5 टक्के जीडीपी वाढीच्या दराची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


गेल्या वेळच्या पतधोरणाच्या वेळीही रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कोणतेही बदल केले नव्हते. सध्या महागाई वाढत असल्याने व्याजदर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण या वेळीही व्याजदरात कोणताही बदल झाला नसल्याने कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. 


 






रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, "कोरोनाच्या परिस्थितीतही देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे. सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विचार करता थोडी अनिश्चितता वाढत आहे. परंतु आपला देश या संकटाचा सामना करण्यास सज्ज आहे."


देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरणात कोणताही बदल करणार नाही असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. देशातील सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना पतधोरणात कोणताही बदल करणे परवडणारे नाही असंही त्यांनी मत व्यक्त केलं होतं. 


महत्वाच्या बातम्या :