नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आणि आरोग्य यंत्रणांकडून काही महत्त्वाचे नियम आखून देण्यात आले आहेत. यापैकीच एक नियम म्हणजे मास्क वापराचा. याचसंदर्भात आता दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. कार (Car) ची वर्गवारीसुद्धा सार्वजनिक स्थळामध्ये करत, कारमध्ये असणाऱ्या एकट्या व्यक्तीलाही मास्कचा वापर बंधनकारक असेल असा निर्णय दिला आहे. मास्क एका सुरक्षा कवचाप्रमाणं काम करत कोविड 19 चा संसर्ग पसरण्यावर नियंत्रण आणण्यास मदतीचा ठरेल हे निरीक्षण उच्च न्यायालयाकडून मांडण्यात आलं आहे.
Corona vaccination : देशात लसीकरण मोहिमेला वेग; आतापर्यंत देण्यात आले 8.40 कोटींहून अधिक लसींचे डोस
कारमध्ये एकट्या असणाऱ्या व्यक्तीनंही मास्क वापरण्याच्या निर्बंधाविरोधातील एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं यासंदर्भातील निर्णय दिला. दिल्लीमध्ये मास्क वापरासंदर्भातील निर्बंध अधिकच कठोर होताना दिसत आहेत. इथं मास्क न वापरणाऱ्यांकडून 2 हजार रुपयांचा दंडही आकारला जात आहे. इतकंच नव्हे तर कारमध्ये असतेवेळीही नागरिकांनी मास्क न वापरल्यामुळं त्यांच्याकडून दंड आकारल्याच्या घटना घडल्या होत्या. याविरोधात पोलीस आणि नागरिकांमध्ये वादही झाला. पण, आता मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मास्क वापरासंदर्भातील चित्र अधिक स्पष्ट झालं आहे.
दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढीला वेग
राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्यानं वाढताना दिसत आहे. ज्यामुळं मंगळवारपासून अरविंद केजरीवाल सरकारक़डून सावधगिरी बाळगत नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. काही व्यवसाय आणि क्षेत्र वगळता रात्रीच्या वेळीची संचारबंदी दिल्लीत लागू करण्यात आली आहे.
देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीनं मोडले सर्व विक्रम
मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल 1 लाख 15 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य विभागानं याबाबतची माहिती दिली. देशातील रुग्णसंख्येचा हा आकडा सध्या परिस्थिती किती गंभीर आहे, याचीच जाणीव करुन देत आहे. आरोग्य मंत्रायलयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत 630 रुग्णांना कोरोनामुळं जीव गमवावा लागला आहे. तर, 59 856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.