चंदिगढ : बस चालवताना टिकटॉक व्हिडिओ शूट करणाऱ्या पंजाबमधील बस चालकाला निलंबित करण्यात आलं आहे. 'टिकटॉक' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पंजाब रोडवेजकडून ही कारवाई करण्यात आली.
अमनजोत ब्रार याने जालंधर-दिल्ली मार्गावर बस चालवताना सात जुलै रोजी हा व्हिडिओ शूट केला होता. ड्रायव्हिंग करताना व्हिडिओतील गाण्यासोबत लिपसिंकही त्याने जुळवले होते. व्हिडिओ समोर आल्यानंतर कंपनीच्या महाव्यवस्थापकांनी तातडीने कारवाई केली.
अमनजोत ब्रार याच्या निलंबनानंतर विभागस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. बस चालवताना व्हिडिओ शूट करणे किंवा फोनवर बोलण्याला चालकांना सक्त मनाई आहे. चालकाचं लक्ष विचलित झाल्यास अनेकांचे जीव पणाला लागण्याच्या शक्यतेने यापूर्वीही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
या धक्कादायक घटनेकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही, असं पंजाब रोडवेजचे महाव्यवस्थापक परमीत सिंह मिनहास यांनी सांगितलं. इतर कर्मचाऱ्यांनाही बस चालवताना टिकटॉक अॅप किंवा फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.