पणजी : काँग्रेसपासून फारकत घेतलेल्या दहा आमदारांनी आज दिल्लीत जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचे अर्ज भरुन रितसर पक्षप्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेतली. बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज अशा चौघा भाजप आमदारांचा मंत्री म्हणून उद्या किंवा परवा शपथविधी होणार आहे.
कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली दहा आमदार काँग्रेसमधून बुधवारी फुटले. त्यांनी काँग्रेस विधिमंडळ गटाचा दोन तृतीयांश गट भाजपमध्ये विलीन केला. सरकारच्या विधिमंडळ खात्याने हे विलिनीकरण झाल्याचे जाहीर करणारी अधिसूचनाही गुरुवारी जारी केली. काँग्रेसमधील दहा आमदार एकदम पक्षातून बाहेर येण्याची ही दुसरी घटना आहे.
कवळेकर यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना उद्या शुक्रवारी मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल. त्या दृष्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांची गुरुवारी दिल्लीत शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दहा आमदार भेटण्यापूर्वी अगोदर सावंत व तेंडुलकर यांनी शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.अपक्ष मंत्री रोहन खंवटे यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाईल,अशी चर्चा आहे. दिल्लीला गेलेले सगळे नेते उद्या शुक्रवारी सकाळी गोव्यात परतणार आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे गोवा निरीक्षक चेल्लाकुमार गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांनी उरलेल्या पाच आमदारांसोबत चर्चा करुन राजकीय परिस्थितीतीचा आढावा घेतला. काँग्रेस विधीमंडळ नेता निवडीबरोबरच काँग्रेस सोडून गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी न्यायालयात धाव घेण्या बाबत यावेळी चर्चा झाली. काँग्रेसचे पाचच आमदार राहिल्याने त्यांना विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागणार आहे.
मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष आमदार कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. भाजपने मंत्रिमंडळातून वगळल्यापासून मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसशी सलगी वाढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चिल आलेमाव यांची भूमिका नेहमीच संदिग्ध राहिलेली आहे.
काँग्रेसमधून फुटलेले 10 आमदार भाजपमध्ये, चौघं मंत्रिपदाची शपथ घेणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jul 2019 10:30 PM (IST)
बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज अशा चौघा भाजप आमदारांचा मंत्री म्हणून उद्या किंवा परवा शपथविधी होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -