नवी दिल्ली : 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीने भारताला दिलेल्या धमकीवर परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. अशा धमक्या रोजच येत असतात, त्यांना भीक घालण्याची गरज नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं. भारतीय सैन्य आणि सरकारवर एकामागून एक हल्ले करुन अर्थव्यवस्था आणि देशाला खिळखिळा करण्याची आगळीक जवाहिरीने केली होती.


जवाहिरीचा भारताला धमकी देणारा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. 'अशा धमक्या आम्ही जवळपास रोजच ऐकतो. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. आपली सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. प्रादेशिक अखंडत्व आणि सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी त्या सज्ज आहेत' असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदाचं नेतृत्व जवाहिरी करत आहे. 'काश्मिरमध्ये मुजाहिद्दीनने त्यांचं संपूर्ण लक्ष्य भारतीय सैन्य आणि सरकारवर सातत्याने हल्ले करण्यासाठी करण्यासाठी केंद्रित करावं. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल. त्याशिवाय भारताची जीवित आणि वित्तहानीही व्हायला हवी' असा इशारा त्याने दिला होता.


जवाहिरी मूळ इजिप्तचा असून अमेरिकेने त्याच्याविषयी माहिती आणि पुरावे देणाऱ्याला अडीच कोटी डॉलरचं बक्षीस ठेवलं आहे.

जवाहिरीच्या धमकीचा काश्मिरमधील तरुणांवर काहीही फरक पडलेला दिसत नाही. जम्मू काश्मिरच्या बारामुला जिल्ह्यात बुधवारी सैन्यात भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी पाच हजारापेक्षा जास्त युवक जमा झाले आहेत. 10 जुलै ते 16 जुलै या कालावधीत सुरु होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी बांदीपोरा, कुपवाडा, गांदरबल, बारामुला, श्रीनगर, बडगाम, पुलवामा, शोपियां, अनंतनाग आणि कुलगाम जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात युवक आले आहेत.