श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे अर्धशतक साजरे झाले आहे. आज दुपारी 3.25 वाजता रिसॅट - 2BR1 या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. या भारतीय उपग्रहासह इस्रोने इस्त्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या नऊ उपग्रहांना अवकाशात पाठवलं आहे.


रिसॅट - 2BR1 या उपग्रहावर पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी एक्स बँड रडार बसवण्यात आलं आहे. कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनात या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. रिसॅट - 2BR1 हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्वेशन उपग्रह आहे. हा उपग्रह ढगाळ वातावरणात, अंधारातही निरीक्षण करु शकतो. हा उपग्रह अर्थ इमेजिंग कॅमेराद्वारे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमधील चकमकींच्या वेळी लष्कराची मदत करेल.

रिसॅट - 2BR1 या उपग्रहाचे वजन 628 किलो आहे. RISAT-2B मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या RISAT-2B उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते. रिसॅट उपग्रहांची मालिका असून प्रामुख्याने हेरगिरीसाठी या उपग्रहांचा उपयोग करण्यात येणार आहे. तसेच भारताच्या सर्व सीमांवर या उपग्रहाद्वारे लक्ष ठेवलं जाईल. इस्रोने आज रिसॅट - 2BR1 सोबतच अमेरिकेचे सहा उपग्रह इस्रायल, इटली आणि जापानचा प्रत्येकी एक उपग्रहांचे लॉन्चिंग केले.




33 देशांचे 319 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा विक्रम
आजच्या लॉन्चिंगनतर इस्रोने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इस्रोने गेल्या 20 वर्षात 33 देशांचे 319 उपग्रह यशस्वीपणे अवकाशात पाठवण्याचा विक्रम केला आहे. दरवर्षी भारताने सरासरी 16 उपग्रह अवकाशात पाठवण्याची कामगिरी केली आहे.

तीन वर्षात 6 हजार 289 कोटींची कमाई
इस्रोने मागील तीन वर्षांमध्ये (2016-17-18) कमर्शियल लॉन्चिंगद्वारे (विदेशी उपग्रहांचे लॉन्चिंग) जवळजवळ 6 हजार 289 कोटी रुपयांची कमाई केली आहे.