नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत सादर केलं जाणार आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर होण्याचा मार्ग मोगळा झाला आहे. आज राज्यसभेतील चार खासदारांना प्रकृतीच्या कारणास्तव सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचा एक, राष्ट्रवादीचा एक आणि दोन अपक्ष खासदारांचा समावेश आहे. भाजपचे अनिल बलूनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजिद मेनन, अपक्ष खासदार अमर सिंह आणि वीरेंद्र कुमार यांना सुट्टी मंजूर करण्यात आहे.


चार खासदार राज्यसभेत गैरहजर असल्याने बहुमताचा आकडा 119 वर आला आहे. भाजप आणि नागरिकत्व विधेयकाच्या बाजूने असणाऱ्या खासदारांची संख्या 125 आहे. त्यामुळे राज्यातसभेतही हे विधेयक मंजूर होण्यात अडचण येणार नाही, असं दिसून येत आहे.


राज्यसभेतील एकूण सदस्यांची संख्या 245 आहे. त्यापैकी 5 जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे 240 सदस्य असल्याने बहुमताचा आकडा 121 होता. मात्र आज चार खासदार गैरहजर असल्याने बहुमताचा आकडा 121 वरून 119 वर आला आहे. भाजप आणि मित्रपक्षांकडे 123 खासदारांचं समर्थन आहे. तर विरोधी पक्षाकडे 113 खासदारांचं समर्थन आहे. शिवसेना काय भूमिका घेणार याकडेही सर्वांच लक्ष आहे.


शिवसेनेची विरोधी भूमिका


शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं. मात्र आता शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर नागरिकत्व विधेयकाबाबत काही प्रश्न आहेत. सरकारने सर्व शंकांचं निरसन करावं. चर्चेनंतर भूमिक स्पष्ट करु, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.


नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने


भाजप - 83 ( अनिल बलूनी गैरहजर)
जेडीयू - 6
अकाली दल - 3
वाईएसआर काँग्रेस - 2
एलजेपी - 1
आरटीआई -1
बीजेडी - 7
अपक्ष - 3
नामांकित - 3
एआईएडीएमके - 11
असम गण परिषद -1
पीएमके - 1
एनपीएफ - 1
एकूण -123

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात

काँग्रेस - 46
टीएमसी - 13
समाजवादी पार्टी - 9
बीएसपी - 4
राष्ट्रवादी काँग्रेस - 4
आरजेडी - 4
सीपीएम - 4
सीबीआई - 1
आम आदमी पक्ष - 3
पीडीपी - 2
केरळ काँग्रेस - 1
मुस्लीम लीग -1
डीएमके - 5
अपक्ष - 1
नामांकित -1
टीआरएस - 6

संबंधित बातम्या