नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नसताना दुसरीकडे ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ब्लॅक फंगसचा समावेश आयुषमान भारत योजनेत करा किंवा त्यावरचे लायफोसोमाल अॅम्फोटेरिसिन हे इंजेक्शन रुग्णांना मोफत पुरवलं जाईल याची व्यवस्था करा अशी मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनचा पुरवठा योग्य प्रमाणात होतोय का याकडे आता केंद्र सरकाने लक्ष देण्याची वेळ आली आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, "देशात 22 मे रोजी ब्लॅक फंगसच्या रुग्णांची सख्या ही 8848 इतकी होती. 25 मे रोजी ती 11 हजार 717 इतकी झाली. केवळ तीन दिवसात ब्लॅक फंगसचे दोन हजार 869 रुग्ण वाढले. ब्लॅक फंगस सारख्या आजाराचा मृत्यूदर हा 50 टक्क्यापर्यंत आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नये."
केंद्र सरकारने 25 मे नंतर या आजाराच्या रुग्णांची आकडेवारी देणे बंद केलं आहे असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. केद्र सरकार कोरोनाची संख्या जाहीर करत असताना ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या का जाहीर करत नाही असा सवालही त्यांनी विचारला.
ही माहिती, आकडे सरकारने तातडीने उपलब्ध करावेत जेणेकरून त्यावरच्या उपाययोजना गांभीर्याने होती असंही प्रियंका गांधी म्हणाल्या.
काय आहे ब्लॅक फंगस?
कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर म्युकोरमायकॉसिस या बुरशीची वाढ होते. कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे. चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे, नाक दुखणे, रक्ताळ किंवा काळसर जखम ही सर्व म्युकोरमायकॉसिसची लक्षणं आहेत.
महत्वाच्या बातम्या :