मुंबई : आतंरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होत असतानाही भारतात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढताना दिसत आहेत. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शुक्रवारीही वाढ झाली आहे. इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या माहितीनुसार, शुक्रवारी देशातील पेट्रोलच्या किंमतीत 27 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 28 पैशांची वाढ झाली आहे. 


गेल्या आठवड्यात जगभरातील वाढलेल्या लसीकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ होईल असं चित्र होतं. पण या आठवड्यात  पुन्हा लसीकरणाचा वेग मंदावला आणि कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या. 


शुक्रवारी ब्रेन्ट क्रुड ऑईलच्या किंमती 29 सेंट्सनी म्हणजे 0.4 टक्क्यांनी घसरल्या आणि त्या 71.02 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या. तेच अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या बाबतीत घडलंय. अमेरिकेतही कच्च्या तेलाच्या किंमती 29 सेंट्स म्हणजे 0.4 टक्क्यांनी घसरल्या आणि त्या 68.52 डॉलर प्रति बॅरेल इतक्या झाल्या. 


दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 94.76 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 85.66 रुपये इतकी आहे. मुंबईत हीच किंमत अनुक्रमे 100.88 रुपये आणि 92.99 रुपये इतकी आहे. मुंबईत पेट्रोल दराने शंभरी पार केली आहे. 


जवळपास महिन्याभरात, 2 मे पासून आतापर्यंत पेट्रोलची किंमत 4.36 रुपयांनी वाढली आहे तर डिझेलची किंमत 4.93 रुपयांनी वाढली आहे. या वर्षीचा विचार करता पेट्रोलच्या किंमतीत 11 रुपयांची तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 12 रुपयांची वाढ झाली आहे. 


राजस्थानमधील श्री गंगानगर येथे देशातील सर्वाधिक महाग म्हणजे 105.52 रुपयांनी पेट्रोलची विक्री होते. याच ठिकाणी डिझेलची विक्री ही 98.32 रुपये इतक्या दरानं होते. 


भारतीय क्रुड ऑईल बास्केटची सरासरी किंमत ही मार्टमध्ये 64.73 डॉलर, एप्रिलमध्ये 63.4 डॉलर आणि मे मध्ये 66.95 डॉलर इतकी होती. पण भारतीय कंपन्यांनी केवळ मार्च आणि एप्रिलमध्येच किंमती वाढवल्या नाहीत आणि मे महिन्यात, पाच राज्यांच्या निवडणूका पार पडल्यानंतर मात्र त्यामध्ये वाढ करण्यात आली. 


महत्वाच्या बातम्या :