Corona Update : देशात कोरोनाची (Corona) तिसरी लाट धडकली आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत रोज झपाट्याने वाढ होत आहे. देशात काल 1 लाख 79 हजार 723 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीतही (delhi ) कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. दिल्लीत  काल दिवसभरात 22 हजार 751 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्यासह कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 

Continues below advertisement


खासगी कार्यालये बंद ठेवून सर्व कर्मचाऱ्यांनी घरातून काम करण्याच्या सूचना दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिल्या आहेत. 50 टक्क्यांच्या क्षमतांसह आतापर्यंत दिल्लीत सर्व खासगी कार्यालये चालत होती. परंतु, वाढत्या  कोरोनामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. 


दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. दिल्लीतील  सर्व हॉटेल आणि बारही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेलमधून फक्त होम डिलीवरीला परवानगी दिली आहे. 


वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या आधी दिल्लीत नाईट कर्फ्यूसह वीकेंड कर्फ्यूही लावण्यात आला होता. तरीही दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतच आहे. त्यामुळे सरकारने आता खबरदारीचे उपाय म्हणून सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


दिल्लीत कोरोना वाढीचा दर 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रत्येक चार लोकांमागे एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत आहे. 2021 च्या मे महिन्यात दिल्लीतील दरापेक्षा हा दर जास्त आहे.


महत्वाच्या बातम्या