ज्या गतीने मोदी देशात आणि जगाच्या पातळीवर प्रसिद्ध होत गेले, त्याच गतीने ते सोशल मीडियातही प्रसिद्ध होत गेले. सोशल मीडियात सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या जागतिक नेत्यांच्या यादीत मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या पुढे त्यांचे मित्र आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नंबर लागतो. नरेंद्र मोदींनी 2014 च्या निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा आधार घेत 'मोदी व्हेव'चा चांगलाच वापर केला. सोशल मीडियाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळे सोशल मीडिया आणि मोदींचं कनेक्शन 'अब की बार मोदी सरकार'पासूनच संपूर्ण देशाने पाहिलं आहे.
मोदींचे ट्वीट्स कसे वाढत गेले?
2009 साली मोदींनी ट्विटरवर आगमन केलं, गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे ट्वीट तुलनेनं फार कमी असायचे आणि पहिल्या दोन वर्षात तर फक्त नावालाच ते ट्विटर होते असं चित्र होतं. नरेंद्र मोदी 2009 साली दिवसाला 0.62 आणि 2010 साली तर फक्त 0.23 ट्वीट करायचे.मात्र 2011 नंतर त्यांच्या ट्वीट्सची संख्या वाढत गेली. 2011 साली दिवसाला 1.17, 2012 साली 3.28 आणि 2013 मध्ये 4.19 ट्वीट त्यांच्या अकाऊंटवरून केले गेले.
पंतप्रधान मोदींचे दिवसाला बारा ट्विट
2014 साली देशात संत्तातर झालं, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर मात्र मोदींच्या ट्वीट्सची संख्या चांगलीच वाढली. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी दिवसाला 7.79 ट्वीट्स केले. गेल्या वर्षी मोदी पुन्हा सत्तेत आले. 2019 साली म्हणजे गेल्या वर्षी मोदींनी दिवसाला 11.55 म्हणजेच जवळपास 12 ट्वीट केले.
'गुजरात' ते 'भारत'
2014 साली मोदी देशात पंतप्रधान झाले, मात्र त्याआधी त्यांच्या ट्वीटमध्ये 'गुजरात' या शब्दाचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. 2009 ते 2014 याकाळात मोदींनी 'गुजरात' हा शब्द 693 वेळा आपल्या ट्वीटमध्ये वापरला. त्याच काळात मोदींची राष्ट्रीय राजकारणातली आवड दिसून आली, कारण मोदींनी 2009 ते 2014 काळात आपल्या ट्वीट्समध्ये 'भारत' हा तब्बल 645 वेळा वापरला होता. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये मोठे बदल केले. कालांतराने त्यांच्या ट्वीट्समध्ये ‘भारत’ हा शब्द अनेकदा दिसू लागला. 2014 ते 2019 या मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये मोदींनी 1 हजार 517 वेळा 'भारत' शब्दचा वापर केला, त्या तुलनेत मोदींनी 'गुजरात' हा शब्द फक्त 97 वेळाच वापरला.
गेल्या वर्षभरात मोदी तसे सोशल मीडियात तुलनेने फारसे अॅक्टिव्ह दिसले नाहीत. दिल्ली हिंसाचारावरही त्यांनी दोन दिवासांनी ट्वीट केलं होतं. आता मात्र सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे या आशयाचं ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी सगळ्यांनाच चक्रावून टाकलंय. येत्या रविवारी ते काय भूमिका घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.