PM Modi Vaccine : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना वॅक्सिनचा दुसरा डोस घेतला. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. यापूर्वी मोदींनी भारत बायोटेकच्या देशात विकसित करण्यात आलेल्या कोवॅक्सिनचा पहिला डोस एक मार्च रोजी घेतला होता. 


पंतप्रधान मोदींचं नागरिकांना लसीकरण करण्याचं आवाहन 


पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन लोकांना लसीकरण करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी ट्वीट केलं की, "आज AIIMS मध्ये मला कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. लसीकरण म्हणजे, कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याकडे असलेल्या काही उपायांपैकी एक उपाय आहे. जर तुम्ही लसीकरणासाठी लागू करण्यात आलेल्या अटी-शर्थींमध्ये येत असाल तर लगेच cowin.gov.in वर रजिस्ट्रेशन करुन लसीकरण करा." पंतप्रधान मोदींना लस देणाऱ्या दोन नर्सपैकी एक होत्या पद्दुचेरीच्या पी. निवेदा आणि दुसऱ्या होत्या पंजाबच्या निशा शर्मा. 



दरम्यान, देशात लसीचे आतापर्यंत 9 कोटी डोस देण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात भारतात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. 1 एप्रिलपासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरु झाला होता. ज्याअंतर्गत 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली होती. 


पाहा व्हिडीओ : पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला



पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आजपासून 


देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार आहेत. देशात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपवणं सर्वांसमोर आव्हान झालं आहे. देशात पहिल्यांदाच 24 तासांत एक लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधानांची बैठक पार पडणार आहे.   


महत्त्वाच्या इतर बातम्या :