बंगळूरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इस्रोच्या (ISRO) चांद्रयान टीमची बंगळूरुमध्ये भेट घेतली आहे. मी तुम्हाला भेटण्यास उत्सुक होतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या चांद्रयान टीमचं कौतुक केलं आहे. तसेच, यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यला देखील सलाम केला आहे. 'हा भारताच्या विज्ञान सामर्थ्याचा शंखनाद असून देशाला अभिमान वाटावा असा ह क्षण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे त्यांचा ग्रीसचा दौरा आटोपून थेट इस्रोच्या शास्रज्ञांच्या भेटीला गेले आहेत. 


'त्या' जागेचं नाव 'शिवशक्ती'


चंद्रायान-3 जिथे उतरलं त्या जागेला शिवशक्ती पॉईंट नाव देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली आहे. ही जागा भारताच्या वैज्ञांनिकांच्या कार्याची साक्ष देणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ही शिवशक्ती जागा येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल, यातूनच भारताच्या इच्छाशक्तीचं दर्शन होणार आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहे. 


चांद्रयान -2 गेलेल्या स्थानाचं नाव 'तिरंगा'


चंद्राच्या ज्या जागेवर चांद्रयान -2 गेलं होतं. त्या जागेचं नाव तिरंगा ठेवणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'चांद्रयान -2 जेव्हा लाँच झालं त्याचवेळी आम्ही चंद्राच्या त्या जागेचं नाव ठेवणार होतो. पण मोहिम थोडक्यात हुकली आणि आम्ही ठरवलं की चांद्रयान -3 आणि 2 चं नाव एकत्रच ठेवायचं. आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. त्यानिमित्ताने घरोघरी तिरंगा देखील फडकला. त्यामुळे तिरंग्याशिवाय ही मोहिम अपूर्ण आहे. म्हणून त्या जागेला आम्ही तिरंगा हे नाव दिलं आहे. '


23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन


भारताने ज्या दिवशी चंद्रावर झेंडा फडकवला तो दिवस म्हणजेच 23 ऑगस्ट यापुढे राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या कायमस्वरुपी लक्षात राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या महिला शास्रज्ञांचं देखील यावेळी कौतुक केलं आहे. 


'चांद्रयान -3 मध्ये महिलांचं मोठं योगदान'


चांद्रायान -3 च्या मोहिमेमध्ये नारी शक्तीचं मोठं योगदान असून त्यांचा या यशामध्ये मोठा वाटा आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. खगोलीय सूत्रांचं वैज्ञानिकांच्या माध्यमातून संशोधन करण्यासाठी तरुण पिढीनं पुढं यावं असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशातील तरुणांना केलं आहे. यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'तुम्ही सर्वजण तरुण पिढीची प्रेरणा आहात जी पिढी तुमचं काम पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे या तरुण पिढीला आता आपल्याला घडवायचं आहे. हीच पिढी वैज्ञानिकांच्या शोधांना नवं रुप देणार आहे.' 


चांद्रयान -3 वर काहीच दिवसांत शासनाच्या अधिकृत संकेस्थळाच्या माध्यमातून एक प्रश्न उत्तरांची मोठी स्पर्धा घेणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं आहे. 'हा लढवय्या भारत आहे, आज पर्यंत जिथे कोणीच पोहचलं नाही तिथे आपण पोहचलो आहोत. एक नवा विचार करणारा भारत आहे हे सर्वांना कळालं आहे,' असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. 


पंतप्रधान मोदी हे ब्रिक्स परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर ते एकदिवसाच्या ग्रीसच्या दौऱ्यावर गेले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी इस्रोच्या शास्रज्ञांची भेट घेता आली नव्हती. त्यांचा दौरा आटोपून पंतप्रधान थेट बंगळूरुमध्ये इस्रोच्या शास्रज्ञांच्या भेटीसाठी गेले. यावेळी त्यांनी देशवासीयांना संबोधित देखील केलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


23 ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिन; बंगळुरूमधून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा