PM Narendra Modi : भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचं जगभर कौतुक होतंय. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस दौरा आटोपून आज बेंगळुरुत दाखल झाले आहेत. यावेळी चांद्रयान-3 (chandrayaan 3) मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या टीमच्या सर्व शास्त्रज्ञांची पंतप्रधान भेट घेणार आहेत. तसेच त्यांचे अभिनंदन देखील पंतप्रधान करणार आहेत. 


चांद्रयान-3 च्या यशानंतर लगेचच 23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले आणि शास्त्रज्ञांना भेटण्यास सांगितले. पंतप्रधान मोदी आज (26 ऑगस्ट रोजी) पहाटे 5.30 वाजता बेंगळुरु एचएएल विमानतळावर पोहोचले. आता ते इस्रोसाठी रवाना झाले आहेत.


काय आहे पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम?


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑगस्ट रोजी) सकाळी साडेसहा वाजता विमानतळावरून इस्रोसाठी रवाना झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात कार्यकर्त्यांना भाजपचे झेंडे फडकविण्यास मनाई करण्यात आली आहे. फक्त तिरंगा फडकविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, भाजपच्या घोषणाबाजी न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे तासभर इस्रोमध्ये राहणार आहेत. या ठिकाणी ते इस्रोच्या चांद्रयान 3 टीमचं अभिनंदन करणार आहेत. 


याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटदेखील केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "इस्रोच्या चांद्रयान टीमशी संवाद साधण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्यांचे समर्पण आणि उत्कटता ही खऱ्या अर्थाने अंतराळ क्षेत्रातील आपल्या देशाच्या यशामागील प्रेरक शक्ती आहे."






पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसला भेट दिली 


पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर होते. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष मातामेला सिरिल रामाफोसा यांच्या निमंत्रणावरून 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान जोहान्सबर्ग येथे झालेल्या 15 व्या ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेला ते उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही अनौपचारिक चर्चा केली.


यानंतर पंतप्रधान शुक्रवारी ग्रीसला पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने येथे ग्रीसच्या सर्वोच्च नेतृत्वाबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. गेल्या 40 वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ग्रीस भेट होती.


पाहा व्हिडीओ : 



महत्त्वाच्या बातम्या : 


Chandrayaan-3 : चांद्रयान-3 च्या लँडिगनंतरचं चंद्रावरील पहिलं दृष्य! विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर नेमका बाहेर कसा पडला? इस्रोने शेअर केला खास व्हिडीओ