छत्तीसगड: छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायगडमध्ये विजय शंखनाद रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सनातन धर्म नष्ट करण्याबाबत द्रमुकचे नेते उदयनिधी यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) म्हटलं की, 'छत्तीसगढची ही भूमी भगवान श्री राम यांची मातृभूमी आहे.'
विरोधी पक्षावर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 'आज मी तुम्हा सर्वांना आपल्या देशाविरोधात जी कटकारस्थानं केली जात आहेत. त्याविषयी जागरुक करु इच्छितो. ज्या लोकांना गेल्या नऊ वर्षांपासून तुम्ही सत्तेमधून बाजूला ठेवलं, जे लोकं सातत्याने निवडणुकांमध्ये पराभव स्विकारत आहेत, त्या लोकांमध्ये आता इतका द्वेष साचला आहे की त्यांना तुमच्या संस्कृतीविषयी देखील अडचण निर्माण होऊ लागली आहे.
पंतप्रधान मोदींचा विरोधकांच्या आघाडीवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'काही लोकं या आघाडीला गर्विष्ठ लोकांची आघाडी देखील म्हणतात. आता इंडिया आघाडीने भारताच्या संस्कृतीला संपवून टाकण्याचा निर्धार केलाय. फक्त सत्तेसाठी जी संस्कृती गेल्या हजारो वर्षापासून भारतीय जपतायत ती संपवून टाकण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत.'
पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'सनातन संस्कृती ही अशी आहे की, ज्यामध्ये श्री राम नाविकाला मिठी मारून आशीर्वाद देतात, माकडांची फौज त्याच्यासाठी लढते, जी व्यक्ती कुटुंबात जन्माला येण्याला नाही तर त्याच्या कर्माला प्राधान्य देते. अशा संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहे.'
13.5 कोटी लोकांची गरिबीतून मुक्तता - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणातून गरिबीविषयी देखील भाष्य केलं आहे. देशातील गरिब जनतेला सशक्त करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी केलंय. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, 'फक्त पाच वर्षामध्ये 13.5 कोटी लोकांची गरिबीतून मुक्तता झाली. भाजप सरकारने देशातील गरीबांसाठी तयार केलेल्या योजनांमुळे हे शक्य झालं आहे.'