Suvendu Adhikari : भाजपच्या (Bjp) विरोधातील सर्व पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (Bjp) टक्कर देण्यासाठी विरोधक एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, याच विरोधकांच्या इंडिया आघाडीवर पश्चिम बंगालमधील (West bengal) भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी जहरी टीका केली आहे.  इंडिया आघाडी ही चोरांची आघाडी आहे. त्यांच्या या युतीमुळं 2024 च्या लोकसभेत मोदीजी  400 जागांचा आकडा पार करतील असा विश्वास सुवेंदू अधिकारी यांनी व्यक्त केला. 


इंडिया आघाडी ही भ्रष्ट, घराणेशाही असणाऱ्यांची आहे. या आघाडीमुळं मोदीजी लोकसभेच्या निवडणुकीत 400 जागांचा आकडा पार करतील असे अधिकारी म्हणाले. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे बुधवारी (13 सप्टेंबर 2023) ईडीसमोर हजर झाले होते. बॅनर्जी यांना शालेय भरतीतील कथित अनियमिततेबाबत पुरावे देण्यास सांगण्यात आल्याचे सुवेंदू अधिकारी म्हणाले. दरम्यान, ममता बॅनर्जी या बुधवारी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या 'इंडिया' (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीला हजर राहणार होत्या. परंतू ईडीकडून समन्स मिळाल्यानंतर त्या दिल्लीला गेल्या नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी नंदिग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. नंदिग्राम हा अधिकारी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. नंतर ममता या भवानीपूरमधून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. 


भाजप विरोधात इंडिया आघाडी


भाजप आणि मोदी सरकारविरोधात प्रमुख विरोधी पक्षांची 'इंडिया' आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय रणनीती आखणीसाठी ही आघाडी सज्ज झाली आहे. इंडिया आघाडीची पहिली बैठक ही बिहारमधील पाटणा या शहरात पार पडली होती. त्यांनतर दुसरी बैठक बंगळुरुमध्ये झाली होती. त्यानंतर तिसरी बैठक ही मुंबईत  बैठक पार पडली होती. मुंबईतील बैठकीत आघाडीची महत्त्वपूर्ण अशी समन्वय समितीची घोषणा करण्यात आली होती. या समन्वय पहिली बैठक काल (दि.13 सप्टेंबर) पार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र आणि आघाडी म्हणून भाजपला पराभूत करण्यासाठीची रणनिती यावर प्रामुख्याने बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, या समन्वय समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबतच प्रमुख विरोधी पक्षांचे नेते, अशा एकूण 14 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


इंडिया आघाडीचं ठरलं... मोदी सरकारविरोधात पहिली जाहीर सभा भोपाळमध्ये, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त