Amit Shah Exclusive : गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलीय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत बोलताना अमित शाह म्हणाले, "समान नागरी कायदा लागू करणे हे जनसंघाच्या स्थापनेपासून आमच्या अजेंड्याचा भाग आहे. समान नागरी कायदा ही भारतीय जनता पक्षाची देशातील जनतेशी असलेली बांधिलकी आहे. समान नागरी कायदा असावा हे जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षापर्यंतच्या आमच्या निवडणूक जाहीरनाम्याचा भाग आहे. परंतु, काँग्रेसकडून पहिल्यापासूनच याला विरोध केला जातोय. काँग्रेसने पहिल्यापासून तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे.  राज्यघटनेत कलम 44 अन्वये गार्डियन प्रिंसिपल दिले गेले आहे, ज्यामध्ये राज्यघटनेच्या रचनाकारांची अशी अपेक्षा होती की भविष्यात देशाच्या संसदेने, देशाच्या विधिमंडळांनी समान नागरी कायदा आणावा. समान नागरी कायद्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात धर्माच्या आधारावर कोणताही कायदा नसावा. कलम 14 आणि कलम 15 दोन्ही स्पष्ट करतात की कोणत्याही व्यक्तीला समान वागणूक दिली पाहिजे. धर्माच्या आधारावर कुणालाही विशेष वागणूक मिळू नये, कुणावर अन्याय होऊ नये.