नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. नव्या नोटांची छपाई होईपर्यंत सुट्ट्या पैशांची वानवा होती. त्यामुळेच प्रिंटिंग प्रेसपासून बँकेपर्यंत नोटांच्या प्रवासाच्या कालावधीत कपात करण्यात आली आहे. 21 दिवसांवरुन हा कालावधी अवघ्या 6 दिवसांवर आणण्यात आला आहे.


चॉपर, भारतीय हवाई दलाच्या मदतीमुळे हा कालावधी कमी करण्यास मदत झाली आहे. पुढच्या आठवड्याभरात चलन परिस्थिती सुरळीत होण्याचा अंदाज सरकारतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. शहरी भागांमध्ये नव्या नोटा उपलब्ध झाल्या असून ग्रामीण भागातही चलन पुरवठा सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 15 जानेवारीपर्यंत अर्थव्यवस्था पूर्ववत होण्याची आशा आहे.

दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटांचे आकार वेगळे असल्यामुळे एटीएममध्ये ते बसवण्यासाठी रिकॅलिब्रेशन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये बदल केले जाणार आहेत.

छापखाना ते एटीएम, नोटेचा प्रवास कसा होतो?


1. भारतात चलनी नोटा छापण्याचे चार छापखाने आहेत. आपल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये त्यापैकी एक छापखाना आहे. त्याशिवाय मध्य प्रदेशातील देवास येथे आणि उर्वरीत दोन कर्नाटकातल्या म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधल्या साल्बनीमध्ये आहेत. या चार छापखान्यात चलनी नोटांची छपाई होते.

2. या चार ठिकाणी छापलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेला सुपूर्द केल्या जातात. रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय मुंबईत असलं तरी देशभरातील चार छापखान्यात तयार झालेल्या नोटा मुंबई मुख्यालयात आणल्या जात नाहीत. तर त्या देशभरात विखुरलेल्या रिझर्व्ह बँकेच्या 40 कार्यालयात पोहचवल्या जातात. या सर्व चलनी नोटा खूप मोठ्या संख्येत असतात, म्हणून मोठमोठ्या कंटेनरमधून त्याची वाहतूक होते.

3. रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील 40 कार्यालयातून या नोटा बँकाच्या मागणीप्रमाणे बँक करन्सी चेस्टकडे पाठवल्या जातात. रिझर्व्ह बँकेची वाहतूक आणि पुरवठ्याच्या सोईसाठी देशभरात अशी तब्बल 2800 चेस्ट आहेत.

4. रिझर्व बँकेच्या चेस्टमधून ग्राहकांचा नियमित संपर्क असलेल्या बँकाच्या मुख्यालयात किंवा प्रादेशिक मुख्यालयात या नोटा पोहोचवल्या जातात. त्यासाठी रिझर्व बँक सुरक्षा रक्षकांनी सज्ज असलेल्या कॅश इन ट्रान्झिट म्हणजे रोकड वाहतूक करणाऱ्या कंपन्याची मदत घेतं. या कंपन्याच ही रोकड बँकांना पोहचवतात. रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक करन्सी चेस्टच्या दिमतीला कॅश इन ट्रांझिट कंपनीच्या जवळपास 20 गाड्या दिमतीला असतात. त्यातून गरजेप्रमाणे रोकड बँकांना पोहोचवली जाते.

5. कॅश इन ट्रांझिट कंपन्याच्या सुरक्षा रक्षकांनी सज्ज असलेल्या व्हॅन एका दिवसात जवळपास 10 ते 15 बँक शाखांना रोकड पुरवठा करतात.

6. याच कॅश इन ट्रांझिट कंपन्या रिझर्व बँकेप्रमाणेच काही बँकानाही सेवा पुरवतात. या रोकड वाहतूक पुरवठा करणाऱ्या कंपन्या बँकाच्या नियोजनाप्रमाणे बँक शाखा तसंच ऑफसाईट म्हणजे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या एटीएममध्ये कॅश भरतात. जे एटीएम बँक शाखांशी संलग्न असतात, त्यांच्यात कॅश भरण्याची जबाबदारी मात्र बहुतेक ठिकाणी संबंधित शाखेवरच असते.

संबंधित बातम्या :


चलनातील दहा रुपयांची नाणी बनावट नाही : आरबीआय


नोटाबदलीसाठी डाक विभाग आता रुग्णालयांमध्ये


8 नोव्हेंबरला नोटाबंदी करण्यामागील मोदींचं लॉजिक