मुंबई : नोटबंदीच्या निर्णयानंतर मोबाईल आणि ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्या मालामाल झाल्या आहेत. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्याने अनेकांनी ऑनलाईन खरेदीचा आणि ऑनलाईन पेमेंटचा मार्ग अवलंबला. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांना चांगला फायदा झाला.


ASSOCHAM या उद्योजक संघटनेच्या रिपोर्टनुसार, बँकेव्यतिरिक्त प्रीपेड पेमेंट सर्व्हिस देणाऱ्या अनेक कंपन्या किंवा मोबाईल, तसेच डिजिटल वॉलेट सेवा देणाऱ्या कंपन्यांनी नोटबंदीनंतर आपल्या व्यवसायात चांगली वाढ केली. अधिकाधिक दैनंदिन व्यवहार ऑनलाईन माध्यमातून करण्याकडे लोकांचा कल दिसतो आहे.

45 पीपीआय कंपन्यांनी ऑनलाईन सेवा सुरु केली आहे. मात्र, काही ऑपरेटर्सनीच नोटबंदीच्या काळात प्रभावीपणे आपला व्यवसाय लोकांपर्यंत नेऊन वाढवण्याचा प्रयत्न केला.

ASSOCHAM चे महासचिव डी. एस. रावत यांनी सांगितले, “ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्यांसाठी नोटबंदी एक चांगली संधी आहे. केवळ आताच या व्यवसायाला फायदा होईल किंवा यात वाढ होईल, अशातला भाग नाही. यापुढे या क्षेत्रात नक्कीच वाढ होत राहील.”