नवी दिल्ली : देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी काँग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.


रामनाथ कोविंद यांना 66 % म्हणजेच 7 लाख 2 हजार 44 मतं मिळाली, तर मीरा कुमार यांना 34 % म्हणजेच 3 लाख 67 हजार 314 मतं मिळाली.

रामनाथ कोविंद हे येत्या 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.

मोदी-शाह अभिनंदनासाठी कोविंद यांच्या घरी

दरम्यान, मी गरीब जनतेचा प्रतिनिधी आहे, देशाची सेवा अविरतपणे करत राहणार, अशी प्रतिक्रिया रामनाथ कोविंद यांनी दिली. तर रामनाथ कोविंद यांच्या निवडीने भाजपचा देशभरात जल्लोष सुरु आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह हे कोविंद यांचं घरी जाऊन अभिनंदन करणार आहेत.

विचारसरणीची लढाई सुरुच राहणार- मीरा कुमार

विचारसरणी आणि मूल्यांची लढाई सुरुच राहणार अशी प्रतिक्रिया मीरा कुमार यांनी दिली. त्यांनी रामनाथ कोविंद यांचं अभिनंदन केलं तसंच त्यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय आपल्या पाठिशी उभं राहण्याऱ्या सर्वाचं त्यांनी आभार मानले.

कोविंद पहिल्यापासूनच आघाडीवर

आज सकाळी 11 वाजता, संसद भवनाच्या हॉल क्रमांक 62 मध्ये मतमोजणीला सुरुवात झाली.

एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे मतमोजणीत सुरुवातीपासूनच पुढे होते. पहिल्या फेरीत रामनाथ कोविंद यांना 60 हजार 683 मतं मिळाली. तर मीरा कुमार यांच्या पारड्यात 22 हजार 941 मतं पडली.

या निवडणुकीत 21 खासदारांची मतं बाद झाली आहेत.

राष्ट्रपतीपदी एनडीएचे रामनाथ कोविंदच विराजमान होतील, हे जवळपास स्पष्ट होतं. 776 खासदार आणि 4 हजार 120 आमदारांच्या एकूण मतांचं मूल्य 10 लाख 98 हजार 882 इतकं होतं आणि विजयासाठी कोविंद यांना फक्त 5 लाख 49 हजार 442 मतं गरजेची होती.

एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना 539 खासदारांचं म्हणजेच तब्बल 64 टक्के मतं  मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यापेक्षा दोन टक्के अधिक, म्हणजेच 66 टक्के मतं त्यांना मिळाली. तर मीरा कुमार यांना 229 खासदारांचं म्हणजेच सुमारे 36 टक्के पाठबळ मिळण्याचा अंदाज होता, मात्र त्यांना दोन टक्के मतं कमीच मिळाली.

दरम्यान मतमोजणी सुरु होण्याआधी रामनाथ कोविंद यांनी गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं होतं. दिल्लीतल्या बांगला साहेब गुरुद्वारात कोविंद यांनी प्रार्थना केली.

आम्ही विचारधारेची लढाई लढतोय : मीरा कुमार
"आम्ही पूर्ण निष्ठेने निवडणूक लढवली आहे. आम्ही लढाईची मर्यादा पाळली आहे. देशातील बहुतांश लोकांचा आवाज आम्ही या निवडणुकीत उठवला आहे. आम्ही विचारधारेची लढाई लढत आहोत. हे गुप्त मतदान आहे आणि प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. याबाबत मला कोणतीही टिप्पणी करायची नाही," अशी प्रतिक्रिया मीरा कुमार यांनी आज सकाळी दिली होती.

यापूर्वीच्या राष्ट्रपतींना किती मतं मिळाली?

वर्ष 2012 : राष्ट्रपती निवडणुकीत यूपीएच्या प्रणव मुखर्जी यांना 7,13,763 म्हणजे सुमारे 69% मतं मिळाली होती, तर एनडीएचे पीए संगमा यांना 3.15 लाख म्हणजे सुमारे 31% मतं मिळाली होती.

वर्ष 2002 : राष्ट्रपती निवडणुकीत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना 9,22, 884 म्हणजेत सुमारे 89 टक्के मतं मिळाली होती. तर लक्ष्मी सहगल यांना 1,07,366 म्हणजेच 11% टक्के मतं मिळाली होती.

वर्ष 1997 : राष्ट्रपती निवडणुकीत के आर नारायणन यांना 9.56 लाख म्हणजेच सुमारे 95 टक्के मतं मिळाली होती. तर टीएन शेषन यांना सुमारे 50, 631 म्हणजेच केवळ 5% मतं मिळाली होती.

वर्ष 1992 : राष्ट्रपती निवडणुकीत शंकर दयाल शर्मा यांना 6.75 लाख म्हणजेच 66% मतं मिळाली होती. तर जीजी स्वेल यांना 3.46 लाख म्हणजे सुमरे 34% मतं मिळाली होती.

कोण आहेत रामनाथ कोविंद?
रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.
कानपूर विद्यापीठातून एलएलबीपर्यंतच शिक्षण
1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.
1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं
भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष
8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत

कोण आहेत मीरा कुमार?
मीरा कुमार 1973 मध्ये भारतीय विदेश सेवेत रुजू
माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या.
1985 मध्ये राजकीय कारकीर्द सुरु, लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा खासदारपदी
1990 मध्ये काँग्रेसच्या कार्यकारणी समिती सदस्य होत्या
1996 आणि 1998 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत विजयी
2004 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सामाजिक न्याय मंत्री पदाची सुत्रे
2009 मध्ये लोकसभा अध्यक्षा. देशाच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा.

संबंधित बातम्या

भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर

राष्ट्रपतीपदासाठी मतदान पूर्ण, निवडणुकीत विरोधकांमध्ये फाटाफूट

राष्ट्रपती निवडणुकीत अमित शाहांना मतदानाचा हक्क कसा?

गुजरातचा भाजप आमदार कोविंद यांच्या विरोधात मतदान करणार

राष्ट्रपती निवडणुकीत आमदार-खासदार या खास पेनाने मतदान करणार

कोविंद विरुद्ध मीरा कुमार, राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज दाखल


राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल


राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना शिवसेनेचा पाठिंबा


सुषमा स्वराज यांचा ट्विटरवरुन मीरा कुमार यांच्यावर निशाणा


रामनाथ कोविंद यांना JDU-BJD नंतर TRS चंही समर्थन


राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याबाबतच्या 10 खास गोष्टी


रामनाथ कोविंद 'एनडीए'चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!