India News : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी ओदिशा (Odisha) आणि त्रिपुरा (Tripura) या दोन राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. तेलंगणाचे नेते इंद्रसेना रेड्डी नल्लू (Indra Sena Reddy) यांची त्रिपुराचे राज्यपाल (Governor Of Tripura) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास (Raghubar Das) यांना ओदिशाचे राज्यपाल (Governor Of Odisha) बनवण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवनाने बुधवारी, 18 ऑक्टोबर रोजी एक निवेदन जारी करून या दोन राज्यांसाठी नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. 


दोन्ही राज्यांच्या नव्या राज्यपालांबद्दल जाणून घ्या.


रघुवर दास ओदिशाचे नवे राज्यपाल (Raghubar Das New Governor Of Odisha)


रघुवर दास (Raghubar Das) सध्या भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. रघुवर दास यांनी 2014 ते 2019 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. 1995 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले रघुवर दास हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणारे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री होते. रघुवर दास हे ओडिशाचे विद्यमान राज्यपाल गणेश लाल यांची जागा घेतील. लाल यांना 2018 मध्ये ओडिशाचे राज्यपाल बनवण्यात आले होते.


इंद्र सेना रेड्डी त्रिपुराचे नवे राज्यपाल (Indra Sena Reddy Nallu New Governor Of Tripura)


तेलंगणातील भाजप नेते आणि सध्या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव इंद्र सेना रेड्डी नल्लू यांनाही त्रिपुराच्या राज्यपाल पदाची महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इंद्र सेना रेड्डी नल्लू हे त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची जागा घेतील. आर्य यांना जुलै 2021 मध्ये राज्याचे राज्यपाल बनवण्यात आले होते.


राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला आनंद


भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्रिपुरा आणि ओडिशामध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीबद्दल त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन राज्यपालांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केल्याचे राष्ट्रपती भवनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. रघुवर दास आणि इंद्र सेना रेड्डी नल्लू यांच्या नियुक्त्या त्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यापासून प्रभावी होतील.