नवी दिल्ली: ब्रेन क्लॉट सर्जरीनंतर भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे मात्र स्थिर आहे. या दरम्यान त्यांच्या मृत्यूविषयी अफवा पसरत आहेत. यावर त्यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पण फेक न्यूज पसरवू नका असं आवाहन केलं आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतल्या लष्कराच्या आर अॅंड आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मष्ठा यांनी सांगितलं आहे की, वडिलांची प्रकृती चिंताजनक जरी असली तरी कृपया खोट्या बातम्या पसरवू नका आणि मला फोन देखील करू नका. कारण हॉस्पिटलच्या अपडेट मिळण्यासाठी मला माझा फोन फ्री ठेवावा लागत आहे.


शर्मिष्ठा यांनी काल एक ट्वीट केलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "गेल्या वर्षी 8 ऑगस्टला माझ्या वडिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता, तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. बरोबर एक वर्षाने 10 ऑगस्टला त्यांची तब्येत खूपच बिघडली. त्यांच्यासाठी जे योग्य आहे तेच देवाने करावे, त्याचबरोबर मला दुःख आणि आनंद समान पद्धतीने स्वीकारण्याची ताकद द्यावी. मी सर्वांचे आभार मानते."

तर प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी म्हटलं आहे की, माझ्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्याबद्दल कुणीही अफवा पसरवू नयेत.


प्रकृतीमध्ये सुधारणा नाही

प्रणव मुखर्जीं यांच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.  10 ऑगस्ट रोजी शर्मिष्ठा  मुखर्जी यांनी ट्वीट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली होती.