पुणे : केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयने विविध राज्यातील 36 ठिकाणी छापेमारी केली असून महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यातही धाड टाकली आहे. पुण्यासह देशातील अनेक शहरात छापेमारीची कारवाई सुरू असून पुण्यात केलेल्या कारवाईत सीबीआयने 10 जणांना अटक केली आहे. विविध देशातील नागरिकांना जाळ्यात अडकवून सायबर गुन्हेगारी नेटवर्क विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेची ही मोठी कारवाई आहे. सीबीआयने (CBI) पुण्यातून 10, हैदराबादमधून 5 आणि विशाखापट्टणम येथून 11 जणांना अटक केली आहे. त्यामुळे, सायबर फ्रॉड प्रकरणातील छापेमारीतून सीबीआयने एकूण 26 जणांवर अटकेची कारवाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. 


सीबीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय संचालन विभागाने 24 सप्टेंबर रोजी ऑपरेशन चक्र-III च्या माध्यमातून सायबर फसवणुकीबाबत खटला दाखल केला होता. त्यानंतर, याप्रकरणी तपास सुरू केल्यानंतर गुरुवार सायंकाळपासून आजपर्यंत पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि विशाखापट्टण येथील 32 वेगवेगळ्या जागांवर छापा टाकण्यात आला आहे. पुण्यातील रिजेंट प्लाझा या ठिकाणी सुरू असलेल्या कॉल सेंटरवर ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. सायबर नेटवर्कच्या माध्यमातून कॉल सेंटरमधील कामगारांचा या गुन्ह्यात समावेश असण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान, विविध कॉल सेंटरमधून 170 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 


पुण्यासह हैदराबाद, अहमदाबाद, विशाखापट्टनम यासारख्या शहरातून 26 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, घटनास्थळावरुन मोबाईल फोन, लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक सामग्री देखील जप्त करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत 58 लाख रुपयांची रोकड आणि 3 महागड्या गाड्या सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा


पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा