पूनावाला यांचा एलोन मस्क यांना सल्ला, भारतात गुंतवणुकीबाबत म्हणाले...
Adar Poonawalla Advice to Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे भारतातील वाहनांच्या निर्मितीबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.
Adar Poonawalla Advice to Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे भारतातील वाहनांच्या निर्मितीबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही याबाबत मस्क यांना ऑफर दिली आहे. पण आता एलोन मस्क यांना लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ अदार पूनावाला यांनी सल्ला दिला आहे.
मस्क यांना पूनावाला यांची बिझनेस टीप
पूनावाला यांनी एलोन मस्क यांना ट्विटमध्ये टॅग केले आहे, ज्यामध्ये त्यांनी एलोन मस्क यांना टेस्ला इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी भारतात गुंतवणूक करण्याची ऑफर आणि सल्ला दिला आहे की, ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम गुंतवणूक असेल. पूनावाला यांनी लिहिले की, "जर कोणत्याही परिस्थितीत ट्विटर खरेदी करण्याचा तुमचा करार झाला नाही, तर टेस्ला कारच्या उच्च दर्जाच्या आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी त्या भांडवलापैकी काही भारतात गुंतवण्याचा विचार करा. मी तुम्हाला खात्री देतो की, ही तुमची सर्वोत्तम गुंतवणूक असेल.''
Hey @elonmusk just in case you don't end up buying @Twitter, do look at investing some of that capital in INDIA for high-quality large-scale manufacturing of @Tesla cars. I assure you this will be the best investment you'll ever make.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) May 8, 2022
गाडीकरी यांनीही मस्क यांना दिला होता सल्ला
मस्क यांनी ट्विटरच्या अधिग्रहणासाठी 44 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. मस्क यांनी टेस्ला इलेक्ट्रिक कारच्या विक्रीसाठी भारतातून आयात शुल्क कमी करण्याची मागणी यापूर्वीही केली होती, परंतु सरकार स्थानिक उत्पादनावर भर देत आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, टेस्ला भारतात इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्यास तयार असेल तर काही हरकत नाही, परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करू नये.
मस्क यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सांगितले होते की, भारतात आयात केलेल्या वाहनांद्वारे यश मिळाले, तर टेस्ला भारतात उत्पादन युनिट स्थापन करू शकते. ते म्हणाले होते की टेस्ला आपली वाहने भारतात लॉन्च करू इच्छित आहे. परंतु इतर कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत येथे आयात शुल्क सर्वाधिक आहे. देशात पूर्णपणे आयात केलेल्या कारवर किंमत, विमा आणि मालवाहतुकीसह 100% आयात शुल्क आकारले जाते. मात्र याबाबत ते सरकारशी चर्चा करू शकतात.