नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलावलं तर ते आले नाहीत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावल्यावर मात्र अगदी धावत दिल्लीत आले. नितीशकुमारांचं नेमकं चाललंय तरी काय याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमार मोदींच्या बाजूनं जास्त झुकत चालले असून ते कुठल्याही क्षणी एनडीएत पुन्हा प्रवेश करतील असेही अंदाज व्यक्त केले जात आहेत.


मोदींकडून नितीशकुमारांना खास आमंत्रण

काल राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत बोलणी करण्यासाठी सोनियांच्या निमंत्रणावरुन 17 विरोधी पक्ष दिल्लीत पोहचले होते. आले नव्हते ते केवळ नितीशकुमारच. जेडीयूच्या शरद यादव, केसी त्यागी या इतर नेत्यांना त्यांनी पाठवलं खरं. पण काल व्यस्ततेची जी अनेक कारणं ते सांगत ते अनुपस्थित राहिले, ती मोदींच्या आमंत्रणावर मात्र गायब झाली. मालदीवचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या स्वागताखातर मोदींनी दिलेल्या या स्नेहभोजनाला नितीश यांना खास आमंत्रण होतं.

पण प्रश्न फक्त राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर यूपीएची साथ सोडण्यापुरता नाही. 2014 आधी ज्या नितीशकुमार- नरेंद्र मोदींमध्ये विस्तवही जात नव्हता, तेच आता गळ्यात गळे घालून एकमेकांची स्तुती करत आहेत. बिहारमधल्या दारूबंदीच्या निर्णयाची मोदींनी जाहीरपणे स्तुती केली होती.

लालूंशी मैत्री गळ्यातलं लोढणं?

नितीशकुमार हे आधी एनडीएमध्येच होते. 2012 पर्यंत सगळं ठीक होतं. पण जेव्हा भाजपनं पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना घोषित केलं. त्यानंतर मात्र महत्वकांक्षी नितीशकुमार यांचा तिळपापड झाला. शिवाय त्यांना आपली सेक्युलर इमेज टिकवण्यासाठी मोदींसारख्या कट्टर चेहऱ्याला विरोध करणं भाग होतं. त्यासाठीच प्रसंगी लालूंशी मैत्री करुन त्यांनी बिहारमध्ये पुन्हा सत्ता मिळवली. पण बिहारमध्ये सध्या लालूंची साथ ही नितीशकुमारांची डोकेदुखी ठरलीय. उठताबसता लालूंच्या भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी नितीश यांच्या इमेजवरही शिंतोडे उडतायत. नितीशकुमार किमान स्वबळावर बिहारमधे निवडून आले असते तरी त्यांना मोदींना विरोध करणं सोपं गेलं असतं. पण लालूंची साथ हे त्यांच्या गळ्यातलं लोढणंच बनलं आहे.

नितीशकुमारांची तडजोडवादी भूमिका?

काही दिवसांपूर्वीच 2019 साठी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये मी नसणार, माझा पक्ष छोटा आहे असं विधान नितीशकुमारांनी केलं होतं. मोदींच्या विरोधात 2019 साठी राहुल, ममता यांच्याशिवाय ज्यांना प्रमुख चेहरा म्हणून पाहिलं जातं, त्या नितीशकुमारांनी हे विधान करणं म्हणजे एकप्रकारे शरणागती पत्करल्याचंच लक्षण होतं. कदाचित मोदींना विरोध करून आणखी काही गमावण्याऐवजी त्यांना स्वीकारून किमान बिहार तरी आपल्या हातात कायम राहील अशी तडजोडवादी भूमिका त्यांनी पत्करल्याचा निष्कर्ष यातून काढता येतो.