कुशीनगर : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या कुशीनगर भेटीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या अधिकाऱ्यांनी एक अजब फर्मान काढलं आहे. साबण, शॅम्पूने व्यवस्थित आंघोळ करा आणि नंतरच योगी अदित्यनाथ यांच्या समोर या. असं अधिकाऱ्यांनी फर्मान काढलं.


यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तीतल्या लोकांना साबण, शॅम्पू आणि सेंटचं वाटप केलं आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनानं अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री कुशीनगरच्या मैनपूरमधील दीनापट्टी या गावाला भेट देणार होते. त्याआधी येथील लोकांना साबण, शॅम्पू आणि सेंटचं वाटप करण्यात आलं.

गेल्या अनेक वर्षापासून या गावात विकास झालेला नाही. पण मुख्यमंत्री या गावात भेट देणार असल्याचं कळताच अधिकाऱ्यांनी या गावाकडे लक्ष देणं सुरु केलं. तात्काळ रस्ते तयार करण्यात आले. इतकंच नाही तर शौचालयही बांधण्यात आले.

एकीकडे या गावातील लोकांकडे अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडेही नाहीत. पण अधिकाऱ्यांनी त्यांना योगींसमोर नीट येण्यासाठी तंबी देत थेट त्यांच्या हातात साबण, शॅम्पूच दिला.