नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेला आयसिसचा मोठा कट उधळण्यात यश आलंय. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं देशभरातील 17 ठिकाणी छापे टाकत आयसिसच्या हरकर-उल-हर्ब-इस्लाम या मॉड्युलचा खुलासा केला आहे. याप्रकरणी एनआयएनं 10 संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.

सिरीयल ब्लास्ट करून अनेक राजकीय नेते आणि बड्या हस्तींवर हल्ला करण्याचा या ग्रुपचा कट होता. मात्र दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या मदतीनं राष्ट्रीय तपास यंत्रणेनं 17 ठिकाणी छापेमारी करत हा कट उधळला आहे. अशी माहिती एनआयएच्या पोलिस महानिरीक्षकांनी दिली आहे.

मुफ्ती सोहेल हा या गँगचा प्रमुख असून तो दिल्लीतील जाफ्राबाद इथं राहत असल्याची माहिती एनआयएनं दिली आहे. एनआयएचे आयजी आलोक मित्तल यांनी म्हटले आहे की, 'मुफ्ती सोहेल या गँगचा लीडर आहे. जो दिल्लीतील जाफ्राबादमध्ये राहतो. सोहेल हा ग्रुप चालवत होता. या गॅंगला बरेच बॉम्ब बनवायचे होते. या दहा संशयितांना दिल्ली, अमरोहा, मेरठ, लखनौ, हापूर येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे, असे मित्तल यांनी सांगितले.

दिल्लीच्या सीलामपूर आणि उत्तर प्रदेशातील अमरोहा, हापूर, मीरत आणि लखनऊ येथे एनआयएने छापे टाकले. या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचे साहित्य, हत्यारं आणि दारुगोळा तसेच देशी बनावटीचे रॉकेट लॉन्चरही जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर 7.5 लाख रुपये, सुमारे 100 मोबाईल फोन्स, 135 सिम कार्ड्स, लॅपटॉप आणि मेमरी कार्डही या छाप्यात जप्त करण्यात आले आहेत. इतरही आणखी काही भागात एनआयएकडून छापेमारी सुरुच आहे. 16 संशयितांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर 10 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे एनआयएने सांगितले आहे.