29 डिसेंबरनंतर तुमचं टीव्ही पाहणं स्वस्त होणार की महाग?
एबीपी माझा वेब टीम | 26 Dec 2018 03:09 PM (IST)
ट्रायने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे टीव्ही पाहणं स्वस्त होणार की महाग हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ट्रायच्या नव्या नियमांमुळे टीव्ही पाहणं स्वस्त होणार असल्याचा दावा ट्रायने केले आहे. तर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे केबल टीव्ही ऑपरेटर्सचे म्हणणे आहे.
मुंबई : टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) येत्या वर्षात ग्राहकांना पसंतीचे टीव्ही चॅनेल्स निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे ग्राहकांना जे चॅनेल्स पाहायचे आहेत केवळ त्याचेच पैसे द्यावे लागणार आहेत. परंतु त्यासोबत केबल टीव्ही ऑपरेटर्स, डीटीएच ऑपरेटर्स आणि ग्राहकांवर काही बंधनेही घातली आहेत. नव्या नियमांमुळे ग्राहकांचे टीव्ही पाहणे खूप स्वस्त होणार असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे. परंतु नव्या अटी जाचक असून त्यामुळे आमच्यासोबत ग्राहकांच्या खिशालाही कात्री लागणार असल्याचे केबल आणि डीटीएच ऑपरेटर्सचे म्हणणे आहे. त्यामुळेच देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवारी (27 डिसेंबर) तीन तास केबल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षक प्राईम टाईममधील त्यांच्या आवडीच्या मालिकांना मुकणार आहेत. दर महिन्याला किती खर्च? नेटवर्क फी म्हणून ग्राहकांकडून 130 रुपये आणि त्यावरील टॅक्स घेतला जाईल. ज्यामध्ये ग्राहकांना 100 फ्री टू एअर चॅनेल्स दिले जातील त्यापैकी 26 चॅनेल्स हे दूरदर्शनचे आहेत. दूरदर्शनचे चॅनेल्स ग्राहकांना देणे अनिवार्य आहे. हे सर्व चॅनेल्स ट्रायने निवडलेले आहेत. यापेक्षा जास्त आणि आवडीचे चॅनेल्स पाहण्यासाठी ग्राहकांना त्या-त्या चॅनेलच्या बेस प्राईस रेंजनुसार पैसे द्यावे लागतील. चॅनेल्सची सबस्क्रिप्शन प्राईस रेंज 1 ते 19 रुपये इतकी आहे. आवडीच्या 25 चॅनेल्ससाठी अतिरिक्त 20 रुपये द्यावे लागतील. उदाहरण 130 रुपये : नेटवर्क फी : 100 चॅनेल्स (फ्री टू एअर चॅनेल्स) 30 रुपये : टॅक्स 160 रुपये : चॅनेल सब्सक्रिप्शन फीस : 40 पसंतीचे चॅनेल्स 30 रुपये : पसंतीच्या चॅनेल्सवरील अतिरिक्त टॅक्स एकूण : 130+30+160+30 = 350 रुपये (140 चॅनेल्स) पूर्वीपेक्षा स्वस्त की महाग? एका सर्वेक्षणानुसार कोणत्याही घरामध्ये 40 हून कमी टीव्ही चॅनेल्स पाहिले जातात त्यामुळे ग्राहकांना पूर्वीप्रमाणे 500 हून अधिक चॅनेल्स घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ग्राहकांचे 350 रुपयांपेक्षा अधिक पैसे खर्च होणार नाहीत. परंतु काही चॅनेल्सची बेस प्राईस ही पाच रुपयांपेक्षा अधिक आहे. असे चॅनेल्स जर ग्राहकाने निवडले तर त्या ग्राहकाचे जास्त पैसे खर्च होतील काही चॅनेल्सची बेस प्राईस ही 17 ते 19 रुपये इतकी आहे. ऑफर्सचा भडीमार काही ब्रॉडकास्ट कंपन्यांचे विविध भाषांमध्ये विविध प्रकारचे चॅनेल्स आहेत. या ब्रॉडकास्ट कंपन्यांनी त्यांचे सर्व चॅनेल्स ग्राहकांनी खरेदी करावे यासाठी ऑफर्सचा भडीमार केला आहे. स्टार इंडिया : 13 चॅनेल्स : 49 रुपये झी एन्टरटेन्मेंट : 24 चॅनेल्स : 45 रुपये सोनी पिक्चर्स : 9 चॅनेल्स : 31 रुपये इंडियाकास्ट : 20 चॅनेल्स : 25 रुपये डिज्नी : 7 चॅनेल : 10 रुपये डिस्कव्ही नेटवर्क : 8 चॅनेल : 8 रुपये टाईम्स नेटवर्क : 4 चॅनेल : 7 रुपये एनडीटीव्ही : 4 चॅनेल : 3.5 रुपये टीव्ही टूडे : 2 चॅनेल : 75 पैसे संबंधित बातम्या देशभरात उद्या तीन तास केबल सेवा बंद राहणार