नीरवला सर्वाधिक एलओयू 2017 मध्ये जारी करण्यात आले. त्यांची मुदत मे 2018 पर्यंत आहे. म्हणजे पीएनबीचा बँक मॅनेजर गोकुळनाथ शेट्टीने आपल्या निवृत्तीपर्यंत घोटाळेबाजांना हमीपत्र जारी करुन ठेवली होती. एलओयूमध्ये आणखी काही बँकांची नावं समोर आली असून त्यांच्या मॉरिशस, बहारिन, हाँगकाँग, फ्रँकफर्टमधील शाखांनी नीरव मोदीसाठी रक्कम दिली.
पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी बेल्जियममधून दुसऱ्या शहरात पळून जाण्याच्या तयारीत आहे. एबीपी न्यूजच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे.
नीरव मोदीचे कुटुंबीय बेल्जियममध्येच राहतात. नीरव मोदीच्या भावालाही बेल्जियमचं नागरिकत्व मिळाल्याची माहिती समोर आली आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचे पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द
नीरव मोदीच्या मालकीच्या 18 ठिकाण्यांवर छापे टाकून ईडीने 5 हजार 100 कोटींचे हिरे जप्त केले होते. जप्त केलेल्या हिऱ्यांची किंमत 5 हजार 100 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती आहे. धाड टाकलेल्या ठिकाणांमध्ये गीतांजली शोरुम्ससह अन्य ठिकाणांचा समावेश आहे.
घोटाळा कसा झाला?
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत एक हजार 771 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 11 हजार 360 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. अॅक्सिस आणि अलाहाबाद बँकेच्या परदेशी शाखांचीही या घोटाळ्यात फसगत झाली आहे.
नीरव मोदी आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्या तीन कंपन्यांद्वारे हे षडयंत्र रचल्याचा आरोप आहे. तीन कंपन्यांच्या नावावर हाँगकाँगमधून सामान येणार असल्याचं त्याने सांगितलं. सामान मागवण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंगची मागणी बँकेकडे केली.
लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे मागवण्यात आलेल्या सामानाचे पैसे देण्याची जबाबदारी बँक घेत असल्याचं हमीपत्र. हेच पत्र अलाहाबाद बँक आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँगमधल्या शाखांच्या नावावर काढण्याची मागणी केली. याद्वारे हाँगकाँगहून 280 कोटी रुपयांचं सामान मागवण्यात आलं.
पीएनबीने हाँगकाँगमधील अलाहाबाद बँकेला 5 आणि अॅक्सिस बँकेला 3 लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केली आणि जवळपास 280 कोटी रुपयांचं सामान आणण्यात आलं. 18 जानेवारीला या तिन्ही कंपन्यांचे संबंधित अधिकारी पीएनबीच्या मुंबई शाखेत गेले आणि त्यांनी सामानाचे पैसे भरण्यास सांगितलं.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचं लेटर दाखवलं आणि पेमेंटची मागणी केली. जितके पैसे परदेशात पाठवायचे आहेत, तितकी कॅश भरायला बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र बँकेने जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांची झोपच उडाली. कारण बँकेत एक रुपयाही न ठेवता या कंपन्यांनी लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी करायला लावल्याचं उघड झालं.
बँकेकडून कारवाईची माहिती
पंजाब नॅशनल बँकेने दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून बँक या प्रकरणातून पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या ब्रीच कँडी शाखेतून डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी आणि इतर कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन नीरव मोदी आणि त्याच्या साथीदारांनी बँकेची आर्थिक फसवणूक केली. यानंतर त्याच्या देशभरातील 10 ठिकाणांवर ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाकडून झाडाझडती सुरु करण्यात आली आहे.