Hearing on PM Modi Security Lapse Case: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी आढळून आल्यानं देशभर खळबळ उडाली. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे.  एनजीओ लॉयर्स वॉयसकडून दाखल केलेल्या या याचिकेवर आज मुख्य सरन्यायाधीश एन व्ही रमना, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश  हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढं सुनावणी होणार आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाला पंतप्रधानांच्या दौऱ्यातील सर्व रेकॉर्ड्स सुरक्षित करायला सांगितलं होतं.

  


पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पंजाबच्या चन्नी सरकारने स्थापन केलेल्या समितीवरही सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते. तसेच पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हालचालींचे संपूर्ण रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले होते. सीमेवरील दहशतवादाचा हा मुद्दा आणि एनआयएचे अधिकारी या प्रकरणी तपासात सहकार्य करू शकतील, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीवेळी सांगितलं होतं. 


150 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल


पोलिसांनी IPC कलमानुसार 150 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कुलगढी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारने  केंद्र सरकारला पाठवलेल्या एका रिपोर्टनुसार, या प्रकरणी फिरोजपूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाब सरकारने मोदींच्या सुरक्षेत कोणतीही चूक नसल्याचे म्हटलं आहे. या प्रकरणाची तपासासाठी बुधवारी दोन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.


केंद्राच्या एका टीमने फिरजपूर येथील प्याराना फ्लायओव्हरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसाक केंद्रीय गृहमंत्रालयाद्वारे गठित केलेल्या तीन सदस्यांच्या समितीने पंतप्रधानांच्या पाच जानेवारीच्या संपूर्ण दौऱ्याची माहिती मागितली आहे. या समितीचे नेतृत्त्व सचिव, कॅबिनेच सचिवालयाचे सुधीर कुमार सक्सेना करत आहे आणि दोन सदस्यांच्या समितीत गुप्तचर  ब्युरोचे जॉईंट डायरेक्टर बलबीर सिंह आणि एसपीजीचे आयजी एस. सुरेश यांचा समावेश आहे.  


उड्डाणपूलावर मोदींना 20 मिनिटं करावी लागली  प्रतीक्षा


कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गेल्या बुधवारी पंजाबमध्ये पहिलाच दौरा होता. पंतप्रधान मोदी पंजाबमधील जनतेला संबोधित करणार होते. या दरम्यान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याची घटना घडली. जिथे मोदींचा फिरोजपूर येथे दौरा होता तिथे काही आंदोलकांनी नाकेबंदी केली. त्यामुळे मोदींना एका उड्डाणपूलावर 20 मिनिटं प्रतिक्षा करावी लागली त्यानंतर मोदी दिल्लीला परतले. घडलेल्या घटनेनंतर मोदींना कोणत्याच कार्यक्रमात सहभागी होता आले नाही.   



इतर महत्त्वाच्या बातम्या: