security of pm narendra modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ( PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावेळी त्यांचा ताफा आंदोलकांनी अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द करावा लागला. आता यावरुन देशातील राजकारण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. परंतु संपूर्ण देशाची जबाबदारी असणाऱ्या पंतप्रधानांची सुरक्षा किती महत्वाची असते हेच यानिमित्ताने पुढे आले आहे. तर जाणून घेऊया पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर असते? पंतप्रधानांच्या हवाई आणि रस्त्यावरील प्रवासाचे नियम काय असतात? पंजाबामधील सुरक्षेत झालेल्या चुकीला कोण जबाबदार आहे? 


 
SPG वर असते पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी 
देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी विशेष संरक्षण ग्रुपकडे म्हणजेच SPG कडे असते. पंतप्रधानांच्या चारही बाजूला असलेले सुरक्षेतील जवान SPG चे असतात. या जवानांना अमेरिकेच्या गुप्त सेवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशिक्षण दिले जाते. या जवानांजवळ MNF-2000 असॉल्ट राइफल, ऑटोमेटिक गन आणि 17 एम रिवॉल्वर सारखी आधुनिक हत्यारे असतात. एसपीजी गार्ड्सच्या पदासाठी भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येते. एसपीजी गार्ड्स भारतीय सैन्यदलाबरोबर बीएसएफ, आयटीबीपी, एनएसजीमधूल देखील निवडण्यात येतात.


काय असतो पंतप्रधानांच्या दौऱ्याचा प्रोटोकॉल? 
पंतप्रधानांचा एखाद्या राज्यात दौरा असेल तर यावेळी चार एजन्सी त्यांच्या सुरक्षेचे काम पाहात असतात.  यामध्ये SPG, ASL,  राज्य पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचा समावेश असतो. यातील ASL टीम केंद्रीय सुरक्षा एजन्सीमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असते. 


स्थानिक पोलीस पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या प्रवासाच्या मार्गासह कार्यक्रम स्थळावरील नियम ठरवतात. स्थानिक पोलिसांच्या सुरक्षेची पाहणी SPG अधिकारी करतात. याबरोबरच SPG पंतप्रधानांच्या जवळ येणाऱ्या लोकांची तपासणी आणि आसपासची सुरक्षा पाहतात. 


पंतप्रधानांच्या सुरक्षेतील चुकीला फक्त SPG च जबाबदार?
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी जरी SPG कडे असली तरी पंतप्रधानांच्या राज्य दौऱ्यावेळी स्थानिक पोलीस आणि प्रशासनही सुरक्षेसाठी जबाबदार असते. पंतप्रधानांच्या प्रवासाचा मार्ग आणि मार्गाची तपासणी करण्याचे काम स्थानिक पोलीस आणि प्रशासन करत असते. 


पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या ताफ्यात एक जॅमर असलेली गाडीही असते. ही गाडी रस्त्यापासून शंभर मीटर अंतरापर्यंत कोणत्याही 'रेडिओ कंट्रोल किंवा रिमोट कंट्रोल डिव्हाइसला जाम करते. त्यामुळे रिमोटवरील बॉम्ब आणि IED मध्ये स्फोट होऊ देत नाही. 


पंतप्रधानांच्या सुरक्षेवर रोज किती खर्च होतो?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवर रोज 1 कोटी 62 लाख रूपयांचा खर्च होतो.  2020 मध्ये केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना याबाबतची माहिती दिली होती. 


महत्वाच्या बातम्या