नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं भारतीय राजकारणातला भीष्म पितामह हरपला आहे. वाजपेयींच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर ब्लॉग लिहून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. या ब्लॉगचं मराठी भाषण...

माझे अटलजी

अटलजी आता आपल्यात राहिले नाहीत. मन हे मान्य करत नाही. अटलजी माझ्या नजरेसमोर आहेत, स्थिर आहेत. जे हात माझी पाठ थोपाटत असत, जे प्रेमाने, हसत मला मिठीत घेत असत, ते स्थिर आहेत. अटलजी यांची ही स्थिरता मला डळमळीत करत आहे, अस्थिर करत आहे. डोळ्यात एक दाह आहे, काही सांगायचं आहे, खूप काही सांगायचं आहे, पण सांगत येत नाही. मी स्वत:ला वारंवार हे समजावत आहे की, अटलजी आता नाहीत, पण हा विचार येताच स्वत:ला या विचारापासून दूर सारत आहे. खरंच अटलजी हयात नाहीत? त्यांचा आवाज माझ्या आत घुमत असल्याचं मला जाणवत आहे, कसं सांगू, कसं मान्य करु, ते आता नाहीत.

ते पंचमहाभूते आहेत. आकाश, पृथ्वी, जल, अग्नी, वायू या सगळ्यांमध्ये त्यांची व्याप्ती आहे. ते अटल आहेत, ते अजूनही आहेत. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटलो होतो, त्याची आठवण अशी आहे की, ती जणू आताचीच गोष्ट आहे. एवढे मोठे नेते, विद्वान. काचेच्या पलिकडच्या जगातून कोणीतरी समोर आलं आहे, असं वाटतं. ज्यांचं नाव ऐकलं होतं, ज्यांच्याबद्दल एवढं वाचलं होतं, ज्यांना भेटल्याशिवाय एवढं काही शिकलो होतो, ते माझ्यासमोर होते. जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या तोंडून माझं नाव बाहेर पडलं, तेव्हा वाटलं, बास...मिळवण्यासारखं हेच फार जास्त आहे. माझं नाव घेताना त्यांचा आवाज बरेच दिवस माझ्या कानांवर पडत होता. तो आवाज आता निघून गेला, हे मी कसं मान्य करु.

अटलजी यांच्याबद्दल असं लिहिण्यासाठी मला हातात लेखणी घ्यावी लागेल, असा विचार कधीही केला नव्हता. देश आणि जग अटलजींना एक स्टेट्समॅन, प्रभावी वक्ता, संवेदनशील कवी, विचारवंत लेखक, तडफदार पत्रकार आणि दूरदृष्टी असणारा लोकनेता म्हणून ओळखत होतं. पण माझ्यासाठी त्यांचं स्थान यापेक्षाही वरचं होतं. मला त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली म्हणून मी नाही, तर माझं आयुष्य, माझे विचार, माझ्या आदर्श-तत्त्वांवर जी छाप त्यांनी सोडली होती, जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला होता, त्याने मला घडवलं, प्रत्येक परिस्थितीत अटल राहणं शिकवलं आहे.

आपल्या देशात अनेक ऋषीमुनी, संतांनी जन्म घेतला आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या विकासासाठीही असंख्य लोकांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे. पण स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचं रक्षण आणि 21व्या शतकातील सशक्त, सुरक्षित भारतासाठी अटलजींनी जे केलं, ते अभूतपूर्व आहे.

त्यांच्यासाठी देश सर्वस्व होता-इतर गोष्टींचं काहीही महत्त्व नव्हतं. इंडिया फर्स्ट-भारत प्रथम, हे वाक्य त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. पोखरण देशासाठी आवश्यक होतं, तेव्हा निर्बंध आणि टीकांची काळजी केली नाही, कारण देश प्रथम होता. सुपर कम्प्युटर मिळाले नाहीत, क्रायोजेनिक इंजिन मिळालं नाही याची पर्वा केली नाही, आम्ही स्वत: बनवणार, आम्ही स्वबळाबवर आपली प्रतिभा आणि वैज्ञानिकांच्या कौशल्यावर अशक्य वाटणारं काम शक्य करुन दाखवू आणि असंही केलंही. जगाला आश्चर्यचकित केलं. केवळ एकच ताकद त्यांच्या आत काम करत होती-देश प्रथमची जिद्द.

काळाच्या कपाळावर लिहिण्याची आणि मिटवण्याची ताकद, हिंमत आणि आव्हानांच्या ढगांमध्ये विजयाचा सूर्योदय करण्याचा चमत्कार त्यांच्यात होता, कारण त्यांचं हृदय देश प्रथमसाठी धडधडत होतं. त्यामुळे पराभव आणि विजय त्यांच्या मनावर परिणाम करायचा नाही. जे सरकार बनलं, ते सरकार एक मताने पाडलं तरीही त्यांच्या आवाजात पराभवही विजयाच्या गगनभेदी विश्वासात बदलण्याची ताकद होती आणि जिंकणाराही हार मानेल.

अटलजींनी सामाजिक आणि राजकीय जीवनात नवीन मार्ग बनवले आणि निश्चित केले. 'अंधारातही दिवे लावण्याची क्षमता' त्यांच्यात होती. ते बिनधास्तपणे जे काही बोलत असत, ते थेट जनमानसाच्या हृदयाला भीडत असे. आपलं मत कसं मांडावं, किती बोलायचं आहे आणि कुठे थांबायचं आहे, याची त्यांना जाण होती.

अटलजींनी केलेल्या देशसेवेसाठी, जगभरात भारतमातेचा मान-सन्मानासाठी त्यांनी जे काही केलं, यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. देशवासियांनी त्याला भारतरत्न देऊन स्वत:चा मान वाढवला. पण ते कोणत्याही विशेषण, कोणत्याही सन्मानाच्या वर होते. आयुष्य कसं जगावं, देशाच्या कामी कसं यायचं हे त्यांनी आपल्या जीवनातून दुसऱ्यांना शिकवलं. ते म्हणायचे, 'आपण केवळ स्वत:साठी जगू नये, दुसऱ्यांसाठीही जगा. आपल्याला देशासाठी अधिकाधिक त्याग करायला हवा. जर भारताची अवस्था दयनीय असेल तर जगात आपला मान-सन्मान होणार नाही. पण जर आपण सगळ्या दृष्टीने संपन्न असू तर जग आपला सन्मान करेल.'

देशाच्या गरीब, वंचित, शोषितांच्या जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्न करत राहिले. ते म्हणायचे, 'गरिबी, दारिद्र्य हा प्रतिष्ठेचा विषय नाही, तर ही सक्ती आहे, हतबलता आहे आणि सक्तीचं नाव संतुष्ट असू शकत नाही.' कोट्यवधी देशवासियांना या सक्तीमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. गरिबांना अधिकार मिळवून देण्यासाठी देशात आधारसारखी व्यवस्था, प्रक्रिया शक्य तेवढ्या सोप्या केल्या, प्रत्येक गावात रस्ते, देशात जागतिक स्तरावर पायभूत सेवा, राष्ट्र निर्माणासाठी त्यांनी काम केलं होतं.

आज भारत तंत्रज्ञानाच्या शिखरावर आहे, त्याचा पाया अटलजी यांनीच रचला होता. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. ते स्वप्न पाहायचे पण ती पूर्ण करायची धमकही त्यांच्यात होती. कवी हृदयाचे, भावूक मनाचे तर होतेच सोबत पराक्रमी सैनिकाच्या मनाचेही होते. त्यांनी परदेश यात्रा केल्या. जिथे गेले तिथे सच्चे मित्र बनवले आणि भारताच्या हितासाठी पाया रचत गेले. ते भारताच्या विजय आणि विकासाचे स्वर होते.

अटलजी यांचं कट्टर देशप्रेम आणि राष्ट्रसाठी समर्पण हे कोट्यवधी देशवासियांना कायमच प्रेरणा देईल. देशप्रेम त्यांच्यासाठी केवळ एक नारा नव्हता, तर ती त्यांची जीवनशैली होती. ते देशाला केवळ एक भूखंड, जमिनीचा तुकडा मानत नसत, तर त्याच्याकडे एक जिवंत, संवेदनशील व्यक्तीच्या रुपात पाहिलं होतं. भारत जमिनीचा तुकडा नाही, तर जिवंत राष्ट्रपुरुष आहे, या फक्त भावना नाहीत, तर त्यांचा संकल्प होता, ज्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं. दशकांचं सार्वजनिक आयुष्य त्यांनी आपल्या या विचाराने जगण्यात आणि प्रत्यक्षात आणण्यात खर्ची केलं. आणीबाणीने आपल्या लोकशाहीवर जो डाग लागला होता, तो मिटवण्यासाठी अटलजी यांनी केलेल्या प्रयत्नांना देश कायम लक्षात ठेवेल.

देशभक्तीची भावना, लोकसेवेची प्रेरणा त्यांच्या नावाप्रमाणेच अटल राहिली. भारत त्यांच्या मनात होता, तर भारतीयत्व शरीरात. त्यांनी देशाच्या जनतेला आपलं आराध्यदैवत मानलं होतं. भारताच्या कणा-कणाला, थेंबा-थेंबाला पवित्र आणि पूज्यनीय मानलं.

जेवढा सन्मान, जेवढी लोकप्रियता अटलजींना मिळाली, तेवढेच ते जमिनीशी पाय घट्ट रोवून उभे राहिले. यश कधीही डोक्यात जाऊ दिलं नाही. देवाकडे यशाची अपेक्षा तर अनेक लोक करतात, पण फक्त अटलजीच होते, जे म्हणायचे..
"हे प्रभु! मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना।
गैरों को गले ना लगा सकूं, इतनी रुखाई कभी मत देना"

आपल्या देशवासियांसोबत एवढ्या सहजतेने आणि साधेपणाने जोडले जाणं, त्यांना सामाजिक जीवनाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. ते वेदना सहन करायचे, व्यथा आपल्या मनातच साठवून ठेवायचे पण सगळ्यांना अमृत देत राहिले-आयुष्यभर. जेव्हा त्यांना त्रास झाला तेव्हा ते म्हणाले -'देह धरण को दंड है, सब काहू को होये, ज्ञानी भुगते ज्ञान से मूरख भुगते रोए।' त्यांनी ज्ञान मार्गातून अत्यंत खोल जखमाही सहन केल्या आणि शांत चित्ताने निरोप घेतला.

भारत त्यांच्या रोमारोमात होता, पण जगाची वेदना त्यांचं हृदय पिळवटून टाकत होती. यामुळे हिरोशिमासारख्या कवितांचा जन्म झाला. ते विश्वनायक होते. भारतमातेचे सच्चे विश्वनायक. देशाच्या सीमांवर भारताची कीर्ती आणि करुणेचा संदेश देणारा आधुनिक बुद्ध. काही वर्षांपूर्वी लोकसभेत संसदपटूचा पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला, तेव्हा ते म्हणाले होते की, 'हा देश अतिशय अद्भुत आहे, अनोखा आहे. कोणत्याही दगडाला शेंदूर फासून अभिवादन केलं जात आहे, अभिनंदन केलं जाऊ शकतं.'

आपला पुरुषार्थ, आपली कर्तव्यनिष्ठा देशासाठी समर्पित करणं हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महानता दर्शवते. हाच सव्वाशे कोटी देशवासियांसाठी त्यांचा सर्वात मोठा आणि प्रखर संदेश आहे. देशाच्या साधनांवर, साधनसंपत्तीवर विश्वास ठेवून आपल्याया आता अटलजींची स्वप्न पूर्ण करायची आहेत. त्यांच्या स्वप्नातला भारत बनवायचा आहे. नव्या भारताचा हाच संकल्प आहे, हाच भाव मनात ठेवून मी माझ्याकडून आणि सव्वाशे कोटी देशवासियांकडून अटलजींना श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना नमन करतो.