अटल बिहारी वाजपेयी यांनी 2004 मध्ये लखनौमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार वाजपेयींच्या नावावर 58 लाख 99 हजार 232 रुपयांची म्हणजे अंदाजे 59 लाखांची चल-अचल संपत्ती आहे.
वाजपेयींची चल संपत्ती (रोख, बँकेतील ठेवी आणि सोनं-चांदी) 30 लाख 99 हजार 232 रुपये इतकी आहे. तर अचल संपत्ती (घर, जमीन इत्यादी) 28 लाख रुपये इतकी आहे. स्टेट बँकेच्या एका खात्यात 20 हजार रुपये, दुसऱ्यामध्ये 3 लाख 82 हजार 886 रुपये, तर तिसऱ्यामध्ये 25 लाख 75 हजार 562 रुपये होते.
वाजपेयी अविवाहित होते. 1998 मध्ये वाजपेयी दिल्लीतील सात रेसकोर्स रोडवर राहायला गेले, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण राजकुमारी कौल, त्यांची दत्तक कन्या नमिता आणि जावई रंजन भट्टाचार्य सोबत होते.
वाजपेयींचं मृत्यूपत्र अद्याप समोर आलेलं नाही. मात्र 2005 च्या हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार त्यांची दत्तक कन्या नमिता आणि जावई रंजन भट्टाचार्य यांनाच वाजपेयींचं उत्तराधिकारी मानलं जाणार असून वाजपेयींची संपत्ती त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.
'1987 मध्ये मला किडनीच्या आजाराने ग्रासलं होतं. अमेरिकेला जाऊन उपचार घेण्याइतके पैसे माझ्याकडे नव्हते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी माझी मदत केली.' असं वाजपेयींनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं.