नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 100 व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे. या प्रसंगी पंतप्रधानांसोबत रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित राहणार आहेत.


महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या दरम्यान धावणारी ही किसान रेल्वे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहे असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. ही किसान रेल्वे देशातील 100 वी किसान रेल्वे असणार आहे.


मल्टी-कमोडिटी ट्रेन असणाऱ्या या गाडीच्या माध्यमातून फ्लॉवर, शिमला मिर्ची, कोबी, ड्रमस्टिक, मिर्ची, कांदा यासारख्या भाज्यांची वाहतूक केली जाणार आहे. तसेच जांभूळ, संत्री, केळी तसेच इतर काही फळांचीही वाहतूक करण्यात येणार आहे. या गाडीमध्ये नाशवंत कृषी उत्पादनांच्या वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. भारत सरकारने फळे आणि भाज्यांच्या वाहतूकीसाठी 50 टक्के अनुदान जाहीर केलं आहे.


किसान रेल्वेची सुरुवात 7 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली आहे. पहिली गाडी देवळाली ते दानापूर या दरम्यान सुरु झाली. नंतर याचा मार्ग मुझफ्फरपूर पर्यंत वाढवण्यात आला. या गाडीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने याच्या फेऱ्या आठवड्यातून तीन वेळा वाढवण्यात आल्या. किसान रेल्वे देशभरातील कृषी उत्पादनाच्या वाहतूकीमध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडत आहे.


महत्वाच्या बातम्या: