PM Narendra Modi Punjab Haryana Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज हरियाणा आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. त्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते दोन महत्त्वाच्या आरोग्य उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. तर पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्याबाबत पंजाब पोलीस अलर्टवर असून आतापासून पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली आहे.
महत्त्वाच्या आरोग्य उपक्रमांचे उद्घाटन
पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, सकाळी 11 वाजता पंतप्रधान हरियाणातील फरिदाबाद येथे 2,600 खाटांच्या अमृता हॉस्पिटलचे उद्घाटन करतील. या रुग्णालयाचे व्यवस्थापन माता अमृतानंदमयी मठ करणार आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी 6,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पीएमओने सांगितले की, हे रुग्णालय फरीदाबाद आणि संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील लोकांना उत्कृष्ट आरोग्य सुविधा प्रदान करेल. यानंतर पंतप्रधान मोहालीला जातील आणि तेथे 'होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर'चे उद्घाटन करतील. हे रुग्णालय भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत असलेल्या टाटा मेमोरियल सेंटर या अनुदानित संस्थेने 660 कोटी रुपये खर्चून बांधले आहे.
आधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालय
सर्व प्रकारच्या कर्करोगावरील उपचारासाठी सर्व आधुनिक सुविधांनी युक्त हे रुग्णालय आहे. यामध्ये शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि मेडिकल ऑन्कोलॉजी - केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी 300 खाटांची क्षमता असेल. "हे रुग्णालय संपूर्ण प्रदेशात कर्करोग सुविधा आणि उपचारांसाठी 'केंद्र' म्हणून काम करेल आणि संगरूरमधील 100 खाटांचे रुग्णालय त्याची 'शाखा' म्हणून काम करेल," PMO ने सांगितले.
सुरक्षेबाबत पोलीस सतर्क
यासोबतच पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याबाबत पंजाब पोलीस अलर्टवर असून आतापासून पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहालीचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) एचएस मान म्हणाले, "आम्ही विशेष मोहीम राबवत आहोत आणि 24 ऑगस्टला पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून वाहनांची तपासणी केली जात आहे. याआधी 5 जानेवारीला पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या होत्या, त्यामुळे त्यांचा ताफा फिरोजपूर हायवेवर 15-20 मिनिटे थांबला होता.
श्रममंत्र्यांच्या राष्ट्रीय कामगार परिषदेत करणार मार्गदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 ऑगस्ट रोजी, दुपारी साडेचार वाजता, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील श्रम मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आंध्रप्रदेशात तिरूपती येथे, 25 आणि 26 ऑगस्ट रोजी, ही परिषद आयोजित केली आहे. भारतातील सहकार्यात्मक संघराज्य भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत, श्रम आणि कामगारांसंबंधीच्या विविध मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिक चांगली धोरणे आखली जावीत, तसेच, कामगारांच्यासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्यांमधील समन्वय वाढवण्यासही या परिषदेमुळे मदत होईल.
इतर महत्वाच्या बातम्या