मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


सर्वोच्च न्यायालयात आरे कारशेड प्रकरणी सुनावणी
सर्वोच्च न्यायालयात आज आरे कारशेड प्रकरणी सुनावणी होणार आहे. एकूणच कारशेड प्रकरणातील याचिका निकालात निघण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती उदय लळित यांच्या खंडपीठासमोर याचिका आहे. आरे कारशेड परिसरातील काम थांबवावे आणि वृक्षतोड न होण्यासाठी याचिका दाखल आहे. याआधी प्रकरण 10 ऑगस्ट रोजी लिस्ट झालं होतं. मात्र वेळेअभावी सुनावणी झाली नव्हती. आज सकाळी 11.30 पर्यंत सुनावणी सुरु होऊ शकते. पर्यावरणप्रेमींकडून ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन आणि प्रशांत भूषण याचिकाकर्त्यांची बाजू मांडतील.
 
औरंगाबादमध्ये ख्रिश्चन महासंघाचं भोंदूबाबाच्या बातमीविरोधात आंदोलन
एबीपी माझानं औरंगाबादमधील ख्रिश्चन बाबाचा भोंदूपणा उजेडात आणला होता. या बातमीनंतर भोंदूबाबा बाबासाहेब शिंदेवर कारवाई करण्याची मागणी होत होती. याचा निषेध करण्यासाठी ख्रिश्चन महासंघाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात येणार आहे.


समर्थांच्या मंदिरातील चोरी प्रकरणी गावकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन
जालन्यातील जांब समर्थ येथे श्रीराम मंदिरात झालेल्या मूर्ती चोरी प्रकरणी निषेध म्हणून ग्रामस्थ सकाळपासून संध्याकाळपर्यत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. पोलीसांनी लवकरात लवकर आमच्या मूर्तीचा शोध लावावा असे अवाहन गावकऱ्यांनी केलंय.


पंतप्रधान मोदी बुधवारी हरियाणा आणि पंजाब दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा आणि पंजाबचा दौरा करणार आहेत. त्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते दोन महत्त्वाच्या आरोग्य उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते हरियाणातील फरिदाबाद येथे अमृता रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोहालीला जातील आणि दुपारी 02:15 वाजता मुल्लानपूर, न्यू चंदीगड, साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा (मोहाली) येथे ‘होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र’ राष्ट्राला समर्पित करतील.


आज बिहारमध्ये नव्या सरकारची बहुमत चाचणी 
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी राजकीय भूंकप घडवत भाजपला धक्का दिला. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलासबोत सत्ता स्थापन केली. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता या महागठबंधनच्या सरकारसमोर सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचं आवाहन आहे. आज आणि उद्या विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. आज नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.