Nupur Sharma : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आणि संपूर्ण देशासह परदेशातून देखील संतापाची लाट उसळली. त्यांच्या वक्तव्यानंतर देशभर आंदोलने झाली. सोलपुरात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला औरंगाबादमध्ये आंदोलनं झाली, नवी मुंबई , नाशिकमध्ये वातावरण तापलं. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे परिणाम पाहिल्यानंतर भाजपने आपले हात बाजूला काढले मात्र, तरीदेखील प्रकरण काही शांत होत नाही. परंतु, हा वाद निर्माण करणाऱ्या नुपूर शर्मा कोण आहेत याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.  


भारतासह पाकिस्तान आणि इतर इस्लामिक देशांमध्ये नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात संतापाची लाट आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपाने त्यांना प्रवक्तेपदावरून दूर केले. शिवाय नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे पक्ष समर्थन करत नसून त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक आहे, त्याचा पक्षासोबत काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलं. 


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर देशभरात त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. 
नुपूर शर्मा यांनीही या प्रकरणी माफी मागितली. त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानपूर दौऱ्यापूर्वी याचे पडसाद कानपूरमध्ये उमटले आणि दोन गटांमध्ये या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला.  


कोण आहेत नुपूर शर्मा? 
23 एप्रिल 1985 रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या नुपूर शर्मा ब्राह्मण कुटुंबातील आहेत. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीमुळे त्या उत्तम वक्ता आहेत. त्यांनी भारताबरोबर लंडनमध्येही  शिक्षण घेतले आहे. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील दिल्ली पब्लिक स्कूल मधून पूर्ण केलं आणि हिंदू कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले.


दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या युवा शाखेतील महिला राजकारणी म्हणून नुपूर शर्मांची ओळख आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नुपूर भाजपच्या कार्यकारिणीच्या सदस्याही आहेत. म्हणजेच या वादापूर्वीपर्यंत होत्या. 2009 मध्ये त्यांनी कॉलेजच्या जीवनात राजकारणात प्रवेश केला. शर्मा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिकिटावर दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली आणि ती जिंकली.


2015 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उमेदवारी दिली. परंतु त्यांचा पराभव झाला. 2020 मध्ये शर्मा यांना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते बनवण्यात आले होते.