Coronavirus in India : कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. चीनपासून जपान आणि अमेरिकेपर्यंत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. याबाबत आता भारत सरकारही अलर्ट मोडवर आलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (22 डिसेंबर) उच्चस्तरीय बैठक (High Level Meeting) घेणार आहेत. दुपारी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.






याआधी बुधवारी (21 डिसेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनीही अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यादरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारतात सध्या कोरोनाची प्रकरणं वाढत नाहीत, परंतु त्याचे प्रकार ओळखण्यासाठी लक्ष ठेवणं आणि ट्रॅक करणं आवश्यक आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी बैठकीत सांगितलं की, आतापर्यंत केवळ 27 ते 28 टक्के नागरिकांनीच कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. ते म्हणाले की गर्दीच्या ठिकाणी, विशेषत: वृद्धांनी मास्क घालावं जेणेकरुन संसर्ग टाळता येईल.


"कोविड-19 अद्याप संपलेला नाही, शेजारील चीन आणि इतर देशांमध्ये कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे," असंही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितलं. 


भारतात ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट BF.7 ची एन्ट्री


चीनमध्ये (China) कोरोना व्हायरस (Coronavirus In China) पुन्हा एकदा झपाट्याने पसरत आहे. समोर आलेल्या एका अहवालानुसार, Omicron चं सब-व्हेरियंट BF.7 हे चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होत असलेल्या वाढीमागील प्रमुख कारण आहे. या सब-व्हेरियंटमुळे आता भारत सरकारचीही चिंता वाढली आहे. भारतात आतापर्यंत BF.7 ची चार प्रकरणं आढळून आली आहेत. गुजरात आणि ओदिशात प्रत्येकी 2 प्रकरणं समोर आली आहेत.


भारतात कोरोनाचे 10 व्हेरियंट


भारतात सध्या कोरोनाचे 10 वेगवेगळे व्हेरियंट आहेत. यातील सर्वात नवीन व्हेरियंट BF 7 हा आहे. आताही देशात सर्वात घातक डेल्टा व्हेरियंटचे काही रुग्ण आढळत आहेत. भारतातील बहुतेक लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे. भारतातील परिस्थिती चीनप्रमाणे भयावह नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. परंतु नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घेणं आवश्यक आहे. सध्यातरी कोविडच्या मार्गदर्शन सूचनांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.