आयटी क्षेत्राशी आपलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी आणि त्यांना आपलं व्हिजन सांगण्यासाठी खास ‘मैं नहीं हम’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. नेहरु स्टेडियमच्या टाऊन हॉलमध्ये सुमारे एक लाख आयटी प्रोफेशनल भोवताली असतील आणि मधोमध पंतप्रधान मोदी फिरत असतील, असे एकंदरीत संवादात्मक स्वरुपात कार्यक्रम असेल.
या कार्यक्रमादरम्यानच पंतप्रधान मोदी ‘मैं नहीं हम’ वेबपोर्टल आणि अॅप लॉन्च करतील. या माध्यमातून आयटी प्रोफेशनल आपण केलेली सामाजिक कामं इतरांपर्यंत पोहोचवू शकतील. या कामांना ‘गूडनेस’ पॉईंट्स दिले जातील.
जगाच्या कानाकोपऱ्यात आयटी प्रोफेशनलनी भारताचा झेंडा अभिमानानं रोवला आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्यांची धुरा भारतीय आयटी प्रोफेशनलकडे आहेत. भारतातही आजच्या घडीला आयटी क्षेत्रामुळे 300 सुविधा अशा आहेत, ज्यांचा सर्वसामान्यांना थेट लाभ घेता येतो. घरबसल्या एका क्लिकवर या सुविधांचा वापर सर्वसामान्य जनता करु शकते. मात्र, याच आयटी प्रोफेशनलनी समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, म्हणून ‘सेल्फ फॉर सोसायटी’ कार्यक्रमाची संकल्पना मांडली आणि यातून ‘मैं नहीं हम’ संदेश देण्यात येत आहेत.
गेल्या काही वर्षात बंगळुरु, हैदराबाद, गुरुग्राम या आयटी हबपासून आता देशातील लहान-मोठ्या 125 शहरांमध्ये आयटी क्षेत्र पोहोचलंय. बीपीओच्या माध्यमातून भारतातील लहान शहरांमध्ये रोजगाराची संधी निर्माण होत आहे. मात्र, आयटी क्षेत्रातील तरुणवर्गाने आता यातून बाहेर पडत सामाजिक परिवर्तनातही सहभागी व्हायला हवे, असे पंतप्रधान मोदींना वाटते. हेच व्हिजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीत आयोजित ‘मैं नहीं हम’ या कार्यक्रमातून लाखो आयटी प्रोफेशनलसमोर मांडणार आहेत.