अरविंद कुमार हे अमृतसरमधील अपघातावेळी रावण दहन पाहणाऱ्या प्रेक्षकांना चिरडत गेलेल्या रेल्वेचे लोको पायलट आहेत. या अपघातात 62 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची पोस्ट वायरल झाली आहे.
या पोस्टमध्ये असलेल्या फोटोत एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचंही दिसत आहे. इतकंच नाही, तर एका पत्राचा फोटोही वायरल पोस्टमध्ये जोडण्यात आला असून ती लोको पायलटची सुसाईड नोट असल्याचा दावा केला जात आहे.
रावण दहनावेळी 62 जणांना उडवणाऱ्या लोको पायलटने आत्महत्या केली का, याचा शोध 'एबीपी माझा'च्या टीमने घेतला. तेव्हा, या पोस्टमध्ये केलेला दावा सपशेल खोटा असल्याचं समोर आलं.
आत्महत्या करणाऱ्या ज्या व्यक्तीचा फोटो वायरल झाला आहे, त्याचं नाव हरपाल सिंग आहे. तो अमृतसरमधील ट्रेनचा लोको पायलट अरविंद कुमार नाही. हरपाल सिंगही अमृतसरचा होता, हाच काय तो योगायोग!
वायरल व्हीडिओच्या शेवटी आत्महत्या केलेल्या व्यक्तीची गाडी दिसत आहे. ही गाडी हरपाल सिंग या व्यक्तीच्या नावे आहे. हरपाल सिंघने 20 ऑक्टोबरला आत्महत्या केली.
वायरल झालेलं सुसाईड लेटर हे खरं तर अपघातावेळीचा ट्रेन चालवणारे लोको पायलट अरविंद कुमार यांचा कबुलीनामा आहे. अरविंद कुमार सध्या चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ही वायरल पोस्ट खोटी असल्याचं सिद्ध होतं.