नवी दिल्ली : एकीकडे देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु असताना, दुसरीकडे ‘मन की बात’ कार्यक्रमातून बोलताना पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात शेतमालाला योग्य हमीभावासाठी मोठा निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, न्यू इंडियातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतमालाला हामीभावासाठी मोठा निर्णय
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “सरकारने हामीभावासंदर्भात जो निर्णय घेतला आहे. त्यात शेतमजूरांना दिला जाणारा मोबदला, पशुधन, उपकरणांवर झालेला खर्च, बियाणे खरेदीची किंमत, खतं, सिंचनावरील खर्च, जमिनीचा मोबदला आणि त्यावरील व्याज, जर एखाद्याने जमीन भाडेतत्वावर घेतली असली तर त्याचं भाडं आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाचे कष्ट यासर्वांचे मुल्यमापन करुन हामीभाव ठरवला जाईल.”
पंतप्रधान पुढे म्हणाले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य किंमत मिळावी यासाठी, देशात अॅग्रीकल्चर मार्केटिंग रिफॉर्मवरही सरकार काम करत आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण
दरम्यान, त्यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचंही स्मरण करुन, ‘ग्राम स्वराज अभियाना’ची घोषणा केली. 14 एप्रिल ते 5 मेपर्यंत हे अभियान देशात राबवलं जाणार असून, याअंतर्गत ग्रामविकास, गरिबी कल्याण आणि सामाजिक न्याय आदी विषयांवर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील, असं सांगून देशातील सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.
'डॉ. बाबासाहेबांनी औद्योगिकीकरणाची संकल्पना मांडली'
डॉ. बाबासाहेबांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या व्हिजनवर काम करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकाळात औद्योगिकीकरणाची संकल्पना मांडली होती. उद्योगांचा विकास शहरातच होणं शक्य असल्याने, त्यांचा शहरीकरणावर विश्वास होता.”
ते पुढे म्हणाले की , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या याच व्हिजनला पुढे नेताना, स्मार्ट सिटी, अर्बन मिशनची सुरुवात केली. ज्यातून महानगरांप्रमाणेच छोट्या शहरातही सर्व प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होईल.”
देशभरात तीन हजार जनऔषधी केंद्र सुरु
स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत दोन्ही एकमेकाला पूरक असल्याचं सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, “स्वस्थ भारतासाठी आरोग्य मंत्रालय विविध राज्यातील आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्यातून काम करत आहे. सध्या देशभरात तीन हजार जनऔषधी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. या केंद्रातून 800 पेक्षा जास्त औषधे माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या औषध केंद्रांवर हृदय रुग्णांसाठी हार्ट स्टँडची किंमत 85 टक्क्यापेक्षा कमी आहे.”
एमबीबीएसच्या जागा 68 हजारावर
ते पुढे म्हणाले की, “आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत 50 कोटी नागरिकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या जागाही वाढवून 68 हजार करण्यात आल्या आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.
याशिवाय, विविध राज्यांमध्ये एम्स रुग्णालय सुरु करण्यात येत असल्याचं सांगून, आगामी काळात प्रत्येकी तीन जिल्ह्यांमध्ये एक नवीन मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार असल्याचंही त्यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान, आगामी काळात येणाऱ्या विविध सणांसाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना शुभेच्छाही यावेळी दिल्या.
‘न्यू इंडिया’तूनच डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल : पंतप्रधान मोदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Mar 2018 01:45 PM (IST)
‘मन की बात’ कार्यक्रमातून बोलताना पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पात शेतमालाला योग्य हमीभावासाठी मोठा निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार केला. तसेच, न्यू इंडियातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -