नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात एका रात्रीत एकानंतर एक अशा सहा एन्काऊंटरमध्ये दोन गुंडांचा खात्मा करण्यात आला. नोएडा पोलिसांनी 1 लाख रुपयांचं इनाम असलेला वाँटेड गुंड श्रवन चौधरीला कंठस्नान घातलं. दिल्ली आणि नोएडात खुनाचे गुन्हा दाखल असलेला श्रवन अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी घटनास्थळाहून एके 47, एसबीबीएल गन आणि स्विफ्ट डिजायर जप्त केली.


दिल्ली आणि नोएडातील मोस्ट वाँटेड गुंडाचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला. त्याच्यावर दोन्ही ठिकाणी 50-50 हजार रुपये इनाम होतं. घटनास्थळाहून काही शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादरीमध्येही पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जिंतेंद्र नावाचा गुंड जखमी झाला, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जितेंद्रवर 25 हजार रुपयांचं इनाम होतं.

गाझियाबादमध्येही विजय नगर भागात रात्री उशीरा चकमक झाली. तर दुसरीकडे थाना सिहानीगेटच्या राजनगर भागात वाहनांची तपासणी करताना दोन दुचाकीस्वार गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात, एका गुंडाला गोळी लागली, तर दुसरा फरार झाला.

शनिवारी रात्री उशीरा सहारनपूरमध्ये पोलिसांनी सलीम नावाच्या गुंडाचा खात्मा केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. घटनास्थळाहून एक लाख रुपये, एक दुचाकी आणि बंदूक जप्त करण्यात आली आहे. या गुंडाला पकडून देण्यासाठी 25 हजार रुपयांचं इनाम होतं.

मुजफ्फरनगरमध्येही पोलिसांच्या गोळीबारात दोन गुंड जखमी झाले. तर एका पोलीस अधिकाऱ्यालाही गोळी लागली. जखमी गुंडांना आणि पोलीस अधिकाऱ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या गुंडांवर दरोडा, हत्या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून पोलिसांनी गुंडांराज संपवण्याचा चंग बांधला आहे. गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला, तर त्याचं उत्तर गोळ्यांनीच दिलं जाईल, असं काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले होते. एकही एन्काऊंटर बनावट नाही, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं.